विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला 2 कोटींचे उत्पन्न | पुढारी

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला 2 कोटींचे उत्पन्न

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री यात्रा पार पडली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरण दर्शनाचा लाभ घेत भाविकांनी दर्शन घेताना श्रींच्या चरणावर व दानपेटीत भरभरून दान टाकले आहे. तर देणगीदेखील मोठ्या प्रमाणात दिली आहे. फोटो फ्रेम, हुंडी पेटी व ऑनलाईनच्या माध्यमातून जमा झालेल्या देणगीत मोठी भर पडली. यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला 2 कोटी 4 लाख 52 हजार 214 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्नात तिप्पट वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. वर्षभरातील चैत्री, माघी, कार्तिकी व आषाढी या चार महत्त्वाच्या यात्रा भाविकांविना केवळ परंपरा खंडित होऊ नयेत म्हणून मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यामुळे दोन वर्षांत मंदिर समितीचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले होते. केवळ ऑनलाईन देणगीच्या माध्यमातूनच उत्पन्नात भर पडत होती.

दुसर्‍या लाटेनंतर कोरोनाचा संसर्ग कमी आणि मुख दर्शन सुरु झाले. त्याचबरोबर माघी यात्रा भरवण्यास शासनाने परवानगी दिल्याने भाविकही लाखोंच्या संख्येने यात्रेला आले. फेब्रुवारीमधील माघी यात्रेत मंदिर समितीला एकूण 1 कोटी 24 लाख 45 हजार 233 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

दरम्यान, 1 एप्रिलपासून निर्बंधमुक्त करण्यात आल्याने दि. 2 एप्रिलपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन सुरु करण्यात आले. दि. 12 एप्रिल रोजी चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा झाला. या सोहळ्यासाठी तीन लाखांवर भाविक आले होते. दरम्यान 1 एप्रिल ते 16 एप्रिल या दरम्यान मंदिर समितीला 20452214 चे उत्पन्न मिळालेले आहे.

यात देणगी स्वरुपात 44 लाख 75 हजार 279 रुपये जमा झाले आहेत. तर हुंडी पेटीत 59 लाख 46हजार 341 रुपये जमा झाले आहेत. तर फोटो विक्रीतून 118775 रुपये, वेदांत भक्तनिवास 188800 रुपये, व्हिडीओकॉन भक्तनिवास 137750, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास 1384800, मोबाईल लॉकर 305130, परिवार देवता 1219461, ऑनलाईन जमा 1543662 व इतर असे एकूण 2 कोटी 4 लाख 52 हजार 214 रुपये आर्थिक उत्पन्न मिळालेले आहे.

यात प्रसादाचे लाडू विक्री बंद ठेवली आहे. यातूनही मिळणारे उत्पन्न मिळालेले नाही. असे असले तरी मागील वर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत या वर्षीच्या चैत्री यात्रेच्या उत्पन्नात 1 कोटी 28 लाख 2 हजार 246 रुपयांचे उत्पन्न जास्त आहे. म्हणजेच तीनपट आर्थिक उत्पन्न जादा मिळाले आहे.

दि. 12 एप्रिल रोजी चैत्री यात्रेचा मुख्य एकादशीचा सोहळा पार पडला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे सदस्य व व्यावस्थापक बालाजी पुदलवाड यांनी यात्रा सोहळा निर्विवादपणे पार पाडला आहे. पदस्पर्श दर्शन घेता आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button