नाशिक : एनडीएसटी मतदारयादी 30 पर्यंत सादर करा; सहकार विभागाच्या प्रशासनाला सूचना | पुढारी

नाशिक : एनडीएसटी मतदारयादी 30 पर्यंत सादर करा; सहकार विभागाच्या प्रशासनाला सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वांत मोठी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉन टीचिंग एम्प्लॉइज सोसायटी अर्थात ‘एनडीएसटी’ पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत मतदारयादी सहकार विभागाने मागवली असून, त्या आधारे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शासकीय व खासगी आश्रमशाळेतील शिक्षक, शासकीय आयटीआय व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. जिल्ह्यात साधारणत: 11 हजार सभासद असलेली एकमेव संस्था म्हणून ‘एनडीएसटी’ सोसायटीचा नावलौकिक आहे. या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने घोषित केला आहे. त्यानुसार पात्र सभासदांची यादी येत्या 30 एप्रिलपर्यंत तयार होणार आहे. त्यानंतर प्रारूप यादीवर हरकती मागवल्या जातील. या हरकती निकाली निघाल्यानंतर अंतिम मतदारयादी घोषित केली जाईल. साधारणत: 31 जुलै 2022 पूर्वी नवीन संचालक मंडळाची निवड व्हायला हवी, असे सहकार विभागाचे आदेश आहेत.

तीन पॅनलची शक्यता
‘एनडीएसटी’ सोसायटीच्या निवडणुकीत यंदा तीन पॅनल उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर यांचा स्वतंत्र पॅनल तयार होईल. माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या माध्यमातून आर. डी. निकम हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही पॅनल सोबतच आता महाविकास आघाडीच्या रूपाने नवीन प्रयोग करण्याचा मानस के. के. अहिरे, साहेबराव कुटे आदी शिक्षक करत आहेत.

सभासदांची कर्जमर्यादा 5 लाखांवरून 15 लाख केली. तसेच व्याजदर 9.5 टक्क्यांवरून अवघे 7 टक्क्यांवर आणला. सभासदांना 25 लाखांचे अपघाती विमा संरक्षण दिले. विशेष म्हणजे सभासदांच्या मुलींच्या विवाहात 11 हजार रुपयांचे कन्यादान ‘एनडीएसटी’ने दिले. डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या. – मोहन चकोर, माजी अध्यक्ष, एनडीएसटी

हेही वाचा:

Back to top button