

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. चिखली परिसरात रविवार (दि. 17) रात्री साडे आठच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
मुलाचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे.लक्ष्मण देवासी (आठ वर्षे, रा. हरगुडेवस्ती, चिखली, मूळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा रविवारी दुपारी साडे बारा वाजता घरातून बाहेर पडला. बराचवेळ झाल्यानंतरही तो घरी न आल्याने त्याच्या पालकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला.
दरम्यान, त्याच्या घरच्यांनी मुलाचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चिखली पोलिसांना या मुलाचा मृतदेह चिखली येथील एका पडक्या घरात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.