नाशिक-पुणे रेल्वे भूसंपादन : शेतकरी मागताय प्रतिहेक्टर 'इतक्या' कोटींचा भाव | पुढारी

नाशिक-पुणे रेल्वे भूसंपादन : शेतकरी मागताय प्रतिहेक्टर 'इतक्या' कोटींचा भाव

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्ह्यात रेल्वेसाठी भूसंपादन करताना सुमारे सात कोटी रुपये प्रतिहेक्टर बाजारभाव देण्यात आला असून, त्याप्रमाणे आमच्या जमिनीलादेखील बाजारभाव मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी बारागाव पिंप्री परिसरातील शेतकर्‍यांनी लावून धरली आहे. नाशिक-पुणे रेल्वे भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्यासाठी भूसंपादन अधिकारी वासंती माळी, रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 18) बारागाव पिंप्री परिसरातील शेतकर्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी शेतकर्‍यांनी बाजारभाव वाढवून देण्याची मागणी केली.

नाशिक-पुणे रेल्वे भूसंपादन प्रक्रियेत जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी दिली. त्यानुसार सिन्नर तालुक्यात रेडीरेकनरचा दर आठ ते दहा लाख असून, रेल्वे भूसंपादनात शेतकर्‍यांना 62 ते 70 लाख रुपये प्रतिहेक्टर बाजारभाव निश्चित करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सध्या तरी या बाजारभावावर शेतकरी नाराज असल्याचे बैठकीत दिसून आले. पुण्याप्रमाणे प्रतिहेक्टर बाजारभाव न दिल्यास जमिनी देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. दरम्यान भूसंपादनात हिस्सा, पोटहिस्सा असे काही वैयक्तिक प्रश्न आड येऊ शकतात. या बाबी सामूहिकरीत्या सोडविता येणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्‍यांना स्वतंत्र अर्ज दाखल करण्याच्या सूचना भूसंपादन अधिकारी माळी यांनी दिल्या. रेल्वेचे अधिकारी कुलकर्णी यांनी शेतकर्‍यांना भूसंपादनातील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.

हेही वाचा :

Back to top button