नाशिक : 11 शहर पोलिसांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नाही! समितीच्या पाहणीत बाब उघड | पुढारी

नाशिक : 11 शहर पोलिसांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नाही! समितीच्या पाहणीत बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा अनुसूचित जाती कल्याण समितीच्या पाहणीत पोलिस आयुक्तालयातील 11 पोलिसांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातील दोन पोलिस सुमारे 15 वर्षांपासून फक्त जात प्रमाणपत्र सादर करून सेवा बजावत होते. मात्र, त्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी सादर केलेली नव्हती, तर इतर नऊ पोलिस 2018 नंतर पोलिस दलात सहभागी झाले असून, त्यांनीही जात प्रमाणपत्र पडताळणी सादर केलेले नसल्याचे समितीच्या पाहणीत उघडकीस आले.

विधानसभा अनुसूचित जाती कल्याण समितीचे पदाधिकारी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. विविध विभागांची माहिती समितीचे पदाधिकारी घेत असून, त्यानुसार मंगळवारी (दि.12) त्यांनी पोलिस दलाचा आढावा घेतला. पाहणीत पदाधिकार्‍यांना शहर पोलिस आयुक्तालयातील 11 पोलिसांनी जात प्रमाणपत्र पडताळणी सादर केलेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या पोलिसांना बडतर्फ करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. पाहणीत एक पोलिस गेल्या 15 वर्षांपासून जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करता सेवा बजावत असल्याचे आढळून आले. तर एक पोलिस 10 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत आहे.

त्याचप्रमाणे 2018 नंतर पोलिस दलात भरती झालेल्या नऊ कर्मचार्‍यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणी सादर केलेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या पोलिसांवर कारवाई होण्याची
शक्यता आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी सादर न केलेल्या पोलिसांची माहिती घेतली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून जात प्रमाणपत्र पडताळणी सादर का केली नाही याबाबत जाणून घेऊन पुढील कारवाई होईल.
– दीपक पाण्डे्य, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

Back to top button