नाशिक : पोलिस आयुक्त पोलिस महासंचालकांना लिहिणार पत्र ; करणार ‘ही’ मागणी | पुढारी

नाशिक : पोलिस आयुक्त पोलिस महासंचालकांना लिहिणार पत्र ; करणार 'ही' मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात विनापरवानगी कोठेही बॅनर लावता येत नाही. शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, कोठेही अतिक्रमणाचा प्रश्न नाही. कायदा व सुव्यवस्थाही अबाधित आहे. त्यामुळे शहरात लागू असलेला आदेश राज्यभरात लागू करावा, अशी मागणी पोलिस महासंचालकांकडे करणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यभरात राबविलेल्या उत्कृष्ट धोरणांचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार ’बॅनरमुक्त नाशिक’सह हेल्मेट सक्ती व इतरही महत्त्वाच्या धोरणांचा अहवाल तयार करून महासंचालकांना सादर करण्यात येणार आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत प्रत्येक आयुक्तालयातील प्रभावी धोरणांवर चर्चा झाली. त्यानुसार हे धोरण सर्वत्र लागू होऊ शकते का, यावरही चर्चा झाली. त्यानुसार नाशिक पोलिस आयुक्तालयात बॅनरमुक्त नाशिक, नो हेल्मेट नो पेट्रोल व इतर उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी पोलिस आयुक्तांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत असते. शहरात बॅनर लावण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक केली आहे. विनापरवानगी बॅनर लावल्यास संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होतात, तर मनपा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. त्यामुळे शहरात विनापरवानगी कोठेही बॅनर लागत नसल्याचा दावा पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी केला आहे. भविष्यात हा आदेश राज्यभरात लागू व्हावा व त्यातून नाशिकसारखे राज्यही बॅनरमुक्त व्हावे, या हेतूने पोलिस महासंचालकांना पत्र लिहिणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

’नो हेल्मेट-नो पेट्रोल’ मोहिमेला पेट्रोलपंपचालकांनी सुरुवातीला सहकार्य केले. मात्र, आता समाजहित विचारात न घेता फक्त आर्थिक फायद्यासाठी पंपचालक विनाहेल्मेट पेट्रोल देण्यावर ठाम आहेत. ही अतिशय चुकीची बाब आहे. रस्ते अपघातात विनाहेल्मेट असलेले दुचाकीस्वार मृत होतात. त्यासाठी पंपचालक कारणीभूत नाहीत. पण, नियम मोडणार्‍यांना इंधन देणे गैर आहे. याची वेळोवेळी जाणीव पंपचालकांना करून दिली आहे. ’आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा’ या संदर्भात महासंचालकांकडून मार्गदर्शन मागविले आहे.
– दीपक पाण्डेय, पोलिस आयुक्त

रस्त्यांचे ड्रोन सर्वेक्षण..
शहरातील रस्ते दुरवस्था आणि वाहतुकीच्या इतर सुविधांबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यासाठी रस्त्यांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे शहर रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली नव्हती. लवकरच ही बैठक होईल. त्यावेळी न्हाईसह महापालिका, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, देवळाली कॅन्टोन्मेंटसह इतर यंत्रणांना एकत्र घेऊन शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल, असे पाण्डे्य यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button