नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने एसटी कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचार्यांनी कामावर परतण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत नाशिक विभागातील सव्वाशे कर्मचारी कामावर परतले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला असून, प्रवासी वाहतूक सेवाही हळहळू पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे.
राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांचा मागील साडेपाच महिन्यांपासून संप सुरू होता. सरकारकडून वारंवार आवाहन करूनही संप मिटत नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर न्यायालयाने सुनावणीत संपकरी कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याबरोबरच कर्मचार्यांवर कारवाई न करण्याची सूचना महामंडळाला केली आहे. या निर्णयानंतर संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली असून, त्याचा अभ्यास केला जात आहे. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत चर्चा करून संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा काही कर्मचार्यांनी घेतला आहे.
कामावर परतलेले कर्मचारी …
चालक – 50,
वाहक- 47
चालक कम वाहक-14
कार्यशाळा कर्मचारी 12
प्रशासकीय कर्मचारी 00
एकुण-123