

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : महागाव, ता. सातारा येथील महेश माणिक चव्हाण (वय 27) या युवकाने सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आयुष्य संपवले. घटनेनंतर महेशच्या मोबाईलमध्ये एक कॉल रेकॉर्ड झाला असून त्या फोननंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी तीन सावकारांवर गुन्हा दाखल झाला असून एकुलत्या एक व कर्त्या मुलाचा जीव गेल्याने ग्रामस्थही संतप्त झाले आहेत.
गणेश अरविंद गायकवाड, प्रमोद नारायण गायकवाड (दोघे रा. क्षेत्रमाहुली, सातारा) व नीलेश विष्णूपंत तांबोळी (रा. महागाव, ता. सातारा) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्तसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मृत महेश चव्हाण यांचे वडील माणिक सोपान चव्हाण (वय 62,रा. महागाव) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महेश चव्हाण या युवकाने महागाव येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतरपरिसरात खळबळ उडाली. चव्हाण कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. पोलिसांनाही या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून त्याचे शवविच्छेदन केले. ही सर्व घटना दि. 6 रोजी घडली आहे.
चव्हाण कुटुंबिय शोकाकूल असतानाच त्यांना दि. 8 रोजी महेश याचा मोबाईल मिळाला. मोबाईल पाहिला असता त्यांना एक धक्कादायक ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाले. या रेकॉर्डिंगमध्ये एक सावकार महेश याला अश्लील शिवीगाळ करत आहे. तसेच 'तू पैसे दिले नाही तर तुझा जीव काढल्याशिवाय राहणार नाही', अशीही दमबाजी करत आहे. हा फोन दि. 6 रोजी रेकॉर्डिंग झाला असून या घटनेतूनच महेश घाबरला व तो अस्वस्थ झाला व त्याने आत्महत्या केली.
प्राथमिक माहितीनुसार महेश याने संशयित तिन्ही आरोपींकडून मार्च 2020 साली व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत देवूनही संशयित परत पैसे मागत होते. ही बाब कुटुंबियांना माहित होती. यातूनच महेश गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता. दि. 6 एप्रिल रोजी महेश सायंकाळ झाली तरी घरी आला नाही. यामुळे वडीलांनी त्याचा शोध घेण्यासाठी फोन लावला. महेश फोन देखील उचलत नव्हता. महेशची शोधाशोध सुरु असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना समजले.
20 टक्क्यांपर्यंत व्याजाने कर्ज…
महेश याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत कोणाकडून कधी व किती व्याजाने पैसे घेतले आहे याबाबतची माहिती दिली आहे. शेतीसाठी 2020 मध्ये गणेश गायकवाड याच्याकडून 3 लाख रुपये 20 टक्के व्याजाने घेतले असून ते व्याजासह परत फेडले आहेत. लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीमुळे नीलेश तांबोळी याच्याकडून 4 लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले आहे. दरम्यान, 2021 मध्ये पुन्हा गणेश गायकवाड याच्याकडून 5 लाखांचे कर्ज 20 टक्के व्याजाने घेतले आहे. प्रमोद गायकवाड याच्याकडून 3 लाखांचे कर्ज 20 टक्के व्याजाने घेतले आहे.