‘ईडी’ कारवाईवर पाटकर म्हणाल्या,”आमच्या आंदोलनाला बदनाम…”  | पुढारी

'ईडी' कारवाईवर पाटकर म्हणाल्या,"आमच्या आंदोलनाला बदनाम..." 

पुढारी ऑनलाईन डेस्क : नंदुरबार जिल्ह्यात ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर ईडीकडून कारवाई केली. याबाबत मेधा पाटकर म्हणाल्या की, “आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून, हे आमच्या सारख्या जन आंदोलनाला आणि संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे”.

आरोप धादांत खोटा

एका व्हिडिओद्वारे मेधा पाटकर यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या खोऱ्यात काम करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या या अभियानाबद्दल एक खळबळजनक बातमी मागील तीन चार दिवसांपासून पसरवण्यात गेली आहे. आमच्यावर जो आरोप लावण्यात आलाय तो धादांत खोटा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी असं दाखवलंय की २० लोकांकडून पैसे आम्हाला एकाच दिवशी मिळाली; पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाही. आम्हाला हे मान्य नाही. पैसे कुठे मिळाल्याचंही आम्हाला आढळलेलं नाही.

याबरोबरच माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगाने नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जे पैसे दिली होते त्याही बद्दल शंका-कुशंका उपस्थित केल्यात. प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला जे सहकार्य केले ते  माजी जिल्हाधिकारी नंदूरबार यांनी केलेल्या शिफारशीवरुन केले. माझगाव डॉकने नंदूरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना अनेक प्रकारची मदत दिलीय.त्यांनी आमच्या जीवन शाळेतील छात्रालयामधील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोन वर्षांसाठी मदत दिली. त्यामुळे आम्हाला नक्कीच सहयोग मिळाला;  पण त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाऊंट्स, ऑडिट, रिपोर्ट सर्वकाही माझगाव डॉकला प्रस्तुत केलं गेलं. त्यांनी मुल्यांकनही केलं आहे. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये याचा उल्लेख आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

जे काही कारस्थान चाललंय ते आमच्या जन आंदोलनाला आणि संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. व्यक्तीश: माझ्याविरोधात आणि आंदोलनाविरोधात अशाप्रकारची एक केस दाखल झाली होती, असं म्हणत या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही केस रद्द करत याचिकाकर्त्याला दंड केला होता. सध्याच्या प्रकरणामध्ये सर्व सहकार्य आम्ही करू. यावेळेला आम्ही पुढे जी काही कारवाई होईल, चौकशी झाली तर त्यामध्ये सहयोग देऊ, असं स्पष्टीकरण मेधा पाटकर यांनी दिले आहे.

भाजपाच्या नेत्याने केली होती तक्रार

गाजियाबाद भाजपा जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉन्‍ड्रिगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा या भाजपाच्या नेत्याने केला आहे.

ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याचा आरोप करणारी एक तक्रार त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. भाजपा नेत्याने केलेल्या तक्रारीत २००५ साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून, ईडीबरोबर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि प्राप्तिकर विभागातही (आयटी) पाटकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्याचे समजते.

नर्मदा नवनिर्माण अभियान हा मुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी असलेला एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यात जून २००५ मध्ये एका दिवसात १ कोटी १९ लाख २५ हजार ८८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची माहिती आहे. ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरुन ५ लाख ९६ हजार २९४ रुपयांच्या एकसमान रकमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झालेली आहे. ही रक्कम जमा करणार्‍या देणगीदारांपैकी एक देणगीदार अल्पवयीन असल्याची तक्रार आहे.

Back to top button