लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर ; 17 पदेही भरणार | पुढारी

लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर ; 17 पदेही भरणार

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. लवकरच या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून याठिकाणी परिसरातील खेड्यांतून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. विविध उपचार घेण्यासाठी खेड्यापाड्यातून लासलगांव येथे नागरिक येतात. तसेच येथील लोकसंख्येत सद्यस्थितीत वाढ होत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाच्या तयार करण्यापासून ते शासनस्तरावर मंजुरी मिळण्यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांकडून आढावा घेत होते. त्यानंतर या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून या ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
लासलगांव येथील ग्रामीण रुग्णालय ३० खाटांवरुन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास सदर श्रेणीवर्धीत ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सदर जागेचे पध्दतीने अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत इतर १३ असे एकूण १७ पदे वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होणार आहे. तसेच या उपजिल्हा रुग्णालयात पुढील टप्यात सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button