जळगाव : भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

जळगाव : भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : भुसावळ येथील साकेगावजवळील पोलिसांनी कंटेनरमध्ये भरलेला तब्बल २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा पकडून तो जप्त करण्यात आला. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, अन्य राज्यांमधून भुसावळमार्गे मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. याआधी देखील अशाप्रकारे गुटख्यांनी भरलेल्या वाहनांवरही अनेकवेळा अशी कारवाई करण्यात आली आहे. तरीही ही गुटखा वाहतूक अजूनही थांबलेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर, गुटखा वाहतूक प्रकरणी पोलीस उपअधिक्षक वाघचौरे यांना गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी सहकार्‍यांचे एक पथक तयार केले आणि ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी केली. या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असलेले दिसले. यावेळी पोलिस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाला. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.

दरम्यान, तिन्ही कंटेनर ताब्यात घेत, पोलिसांनी २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा नेमका कुणाचा याचा शोध सुरु आहे. भुसावळ पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून त्यांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button