लॉकडाऊन काळात तुमच्यावरही गुन्हा दाखल आहे? मग तुम्ही ही बातमी वाचाच | पुढारी

लॉकडाऊन काळात तुमच्यावरही गुन्हा दाखल आहे? मग तुम्ही ही बातमी वाचाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना विविध आदेशांचे पालन करण्यास सांगितले होते. आदेशांचे पालन न करणार्‍या नागरिकांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना दिलासा दिला आहे.

गृह विभागाने विद्यार्थी तसेच नागरिकांवर कलम 188 अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शहरातील हजारो नागरिकांना त्याचा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात लॉकडाऊन काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांवरील कलम 188 नुसार दाखल गुन्हे तत्त्वत: आम्ही मागे घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले आहे.

मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाणार असून, त्यास मान्यता मिळाल्यानंतर राज्यभरात गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्यामुळे नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यांमध्येही नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button