नाशिक : मातोरीचा सुळा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी ; अनेक हेक्टरवरील गवत जळून खाक | पुढारी

नाशिक : मातोरीचा सुळा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी ; अनेक हेक्टरवरील गवत जळून खाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह शहरालगत असलेल्या राखीव व इतर वनक्षेत्रातील वणव्यांची मालिका सुरूच आहे. ब्रम्हगिरी, मायना, रामशेज, चामरलेणी या परिसरातील वणव्यांच्या ज्वाला शांत होण्यापूर्वीच मंगळवारी (दि.22) दरी-मातोरी परिसरातील सुळा डोंगराच्या मागील गायरान क्षेत्रामध्ये आगीचा भडका उडाला होता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आग संपूर्ण परिसरात पसरल्याने अनेक हेक्टरवरील गवत जळून खाक झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विशेषत: पश्चिम भागात वणव्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नैसर्गिक कारणाने वणवे भडकण्याचे प्रकार तुरळक घडतात. मात्र, समाजकंटकांच्या गैरकृत्यातून वणवा लागत आहे. वणव्यामुळे मातोरी गावाचे गायरान व तेथील जैवविविधता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोसाट्याच्या वार्‍याच्या वेगाने वणवा थेट दरीच्या दर्‍यादेवी पर्यटनाच्या भागात पसरल्याने चार तासांनंतरही आग धगधगत होती. वाळलेले गवत आणि वार्‍याचा वेग यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. वणव्याची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, धुराचे लोट निर्माण झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी येत होत्या. काही वेळानंतर वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी येत आग विझविण्याचे कार्य सुरू केले. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुळा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील पांडवलेणी डोंगर परिसरातही सकाळच्या सत्रात वणवा लागला होता.

हेही वाचा :

Back to top button