नाशिक : पोलिसास धक्काबुक्की करणाऱ्यास वर्षभर कारावास | पुढारी

नाशिक : पोलिसास धक्काबुक्की करणाऱ्यास वर्षभर कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की करून त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास वर्षभर कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. गणेश बाबूराव फफाळे (२७, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) असे या आरोपीचे नाव आहे. ५ ऑगस्ट २०१८ रोजी मेरी लिंक रोडवर ही घटना घडली होती.

पंचवटीचे पोलिस अंमलदार रफिक रजा मुनिर शेख हे ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतूक नियोजन करत होते. त्यावेळी आरोपी गणेश फफाळे याच्यासह इतर दोन संशयित दुचाकीवर ट्रिपल सीट येत होते. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी केल्याने शेख यांनी त्यांना जाण्यास सांगितले. मात्र, आरोपीने शेख यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. वाय. सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. गणेशविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, एम. एस. सांगळे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button