अवकाळीने झोडपलं आता व्यापार्‍यांचीही पाठ ; द्राक्षउत्पादकांची परवड थांबेना

अवकाळीने झोडपलं आता व्यापार्‍यांचीही पाठ ; द्राक्षउत्पादकांची परवड थांबेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, त्यात व्यापार्‍यांनीही द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरविली असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना फोन केल्यानंतर ते आठवडाभर थांबा, असे उत्तर देत असल्याने शेतकर्‍यांना व्यापार्‍यांच्या अक्षरश: मिनतवार्‍या कराव्या लागत आहेत.

जिल्ह्यात दि. 8 ते 12 मार्च या काळात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपीटही झाली. यामुळे प्रामुख्याने द्राक्ष व कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्हयात सुमारे हजार हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. तसेच कांद्याचेही जवळपास 500 हेक्टरवर नुकसान झाले आहे. द्राक्षाचा सध्या काढणीचा हंगाम सुरू असून, पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या बागा काढणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मात्र, पाऊस झाल्यापासून व्यापारी बागांकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या अवकाळी पावसानंतर व्यापार्‍यांनी द्राक्ष खरेदी केल्यानंतर ते मोठ्या शहरांमध्ये पोहोचल्यानंतर ओलाव्यामुळे पेट्यांमध्ये बुरशी आली होती.

त्यामुळे आता पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण निवळल्यानंतरच द्राक्ष खरेदीची भूमिका व्यापार्‍यांनी घेतल्यामुळे त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. आधीच पावसाने नुकसान झाले असताना व्यापार्‍यांकडून वेळेवर खरेदी होत नसल्यामुळे दिवसेंदिवस नुकसान वाढत आहे. दरम्यान, पावसामुळे खराब झालेली द्राक्षघडांची काढणी करून ती वायनरींना देण्याचा मार्ग काही शेतकर्‍यांनी पत्करला आहे. मात्र, नुकसानीचे प्रमाण मोठे असल्यामुळे सर्वच शेतकरी वायनरींकडे द्राक्ष पुरविण्यासाठी चौकशी करीत असल्याने त्यांचाही भाव वाढल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news