जळगाव पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीचे खोदकाम करतांना दोन मजूरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
यावल तालुक्यातील बामणोद गावातील झांबरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. याठिकाणी विहिरीचे खोदकाम करत असतांना अचानक दोर बांधलेला लोखंडी खुंटा उपटल्याने काम करणाऱ्या बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर या दोन्ही मजूरांचा तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवार (दि. १०) रोजी रात्री १० वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, पोउनिरी मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.ना. किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री अंधारात मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे शोध घेणे शक्य न झाल्याने सकाळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू असून दुपारी 1 वाजेपर्यत एका मजुरांचे शव सापडले होते. अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेले नाही.