INDvsSL TEST : ऋषभ पंतला शतकाची हुलकावणी, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 357 | पुढारी

INDvsSL TEST : ऋषभ पंतला शतकाची हुलकावणी, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 357

पुढारी ऑनलाईन डेस्क

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 85 षटकांत 6 गडी गमावून 357 धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतने मोहाली कसोटीत झंझावाती खेळी केली. पण त्याचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. ऋषभ पंत 96 धावांवर असताना त्याला सुरंगा लकमलने क्लिन बोल्ड केले. लकमलचा चेंडू पंतच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि तो स्टंपला आदळला. मात्र, पंतच्या फलंदाजीने सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले. पंतने अवघ्या 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते आणि त्यानंतर 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या कुटल्या. त्याने जडेजा सोबत 104 धावांची भागीदारी केली.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची विकेट घेणा-या एम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने जोरदार हल्ला चढवला. पंतने त्याच्या चेंडूंवर पुढे येत अनेक मोठे फटके खेळले. याशिवाय तो धनंजय डिसिल्वावरही तुटून पडला. पंतला संधी मिळताच त्याने हवेत शॉट्स खेळले आणि चेंडू सीमापार धाडले. पंतने श्रेयस अय्यरसोबत 88 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर सहाव्या विकेटसाठी जडेजासोबत शतकी भागीदारी केली.

मोहाली कसोटीत बाद झाल्यानंतर ऋषभ पंत खूप दुःखी होता. त्याच्या कारकिर्दीत पाच शतके हुकल्याने त्याला दुःख झाले. पंतने 90 ते 100 च्या दरम्यान पाच वेळा विकेट गमावली आहे. तो दोनवेळा वेस्ट इंडिजविरुद्ध, एकदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध नर्व्हस 90 चा बळी ठरला आहे. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत 92 धावांवर दोनदा बाद झाला. 2021 मध्ये सिडनी कसोटीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 धावांवर बाद झाला. गतवर्षी चेन्नई कसोटीत तो इंग्लंडविरुद्ध 91 धावांवर बाद झाला आणि आता मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 96 धावांत त्याला विकेट गमवावी लागली आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी लाहिरू कुमाराने मोडली. त्याने रोहित शर्माला 29 धावांवर बाद केले. यानंतर भारताने दुसरी विकेट मयंक अग्रवालच्या रूपात गमावली. त्याने 33 धावा केल्या. लसिथ एम्बुलडेनियाने मयंकला एलबीडब्ल्यू बाद झाला. यानंतर एम्बुलडेनियाने विराट कोहलीला क्लिन बोल्ड करून भारताला तिसरा झटका दिला. विराटने 100व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 45 धावा केल्या. विश्वा फर्नांडोने हनुमा विहारीची खेळी संपुष्टात आणली. त्याने 58 धावांची खेळी साकारली. चहापानानंतर भारताचा डाव ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. पण, धनंजय डी सिल्वाने अय्यरला बाद करून ही जोडी फोडली आणि भारताला पाचवा झटका दिला. अय्यरने 27 धावा केल्या. अय्यरने पंचांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन रिव्ह्यू घेतला. पण त्याचा फायदा झाला नाही. चेंडू ऑफ-स्टंपच्या रेषेवर असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. अय्यर आणि पंत यांनी 5व्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली.

विराटने 8000 कसोटी धावा पूर्ण केल्या

विराट कोहलीने 100व्या कसोटी सामन्यात 38 धावा करताच कसोटी कारकिर्दीत 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा कोहली सहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

Image

100व्या कसोटीत कोहलीकडून शतकाची अपेक्षा होती, पण तो 45 धावांवर बाद झाला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह 155 धावांत 90 धावा जोडल्या. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे 5 वे अर्धशतक होते.

हनुमा विहारीचे अर्धशतक

हनुमा विहारीने शानदार फलंदाजी करताना मालिकेतील पहिले आणि कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 93 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या.

Image

कोहली-विहारीची अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

Image

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव.

श्रीलंकेचा प्लेइंग इलेव्हन:

दिमुथ करुणारत्ने, लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरित अस्लंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा.

Back to top button