धुळे : मोहाडीत दोघा तस्करांकडून गांजासह पिस्तूल, चाकू जप्त | पुढारी

धुळे : मोहाडीत दोघा तस्करांकडून गांजासह पिस्तूल, चाकू जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मध्य प्रदेशातून मुंबईकडे गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच या तस्करांकडून एक पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थाची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय बातमीनुसार दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर पथकाने लळींग टोल नाका, दरिया हॉटेलच्या जवळ तपासणी केली. यामध्ये धुळेकडून मुंबईकडे जाणारी हूड नसलेली केशरी रंगाच्या वाहनास (एम.एच.१६/७१५१)ला थांबण्याचा इशारा दिला. परंतु वाहन न थांबल्याने पथकाने पाठलाग करून टोल नाक्याजवळ वाहनचालक नदिम मोहम्मद शमीम सिद्दीकी (रा. मुंबई) व असलमखान अलीयारखान पठाण (रा. मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून १७,५०० रुपये किमतीचा २.५ किलो गांजा, १५००० रु. किमतीची गावठी पिस्टल, २०० रुपयांचे एक जिवंत काडतूस, एक रामपुरी चाकू व ३,५०,००० रुपयांच्या वाहनासह एकूण ३,८२,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासंदर्भात मुकेश नानाभाऊ मोरे यांच्या तक्रारीवरून इसमांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button