जळगाव : वीज बिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ | पुढारी

जळगाव : वीज बिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ

जळगाव पुढारी वृत्तसेवा : येथील बळीराम पेठ येथे राहणाऱ्या व्यक्तीकडे थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गेले असता, वीज कनेक्शन कट करीत असताना तीन जणांनी अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करत लाथ मारुन अंगावर दगड घेऊन धावल्याचा प्रकार घडला आहे.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सागर प्रल्हाद पाथरवट (वय-३०) हे मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सहाय्यक अभियंता रोहित गोवे यांच्यासह बळीराम पेठेत वसुलीसाठी गेले होते. गंगाराम देवरे यांच्या घरात गणेश वसंत कुलकर्णी हे राहतात. ३२ हजार ६९० इतकी वसुली बाकी असल्याने महावितरणच्या पथकाने बिलाबाबत विचारणा केली. कुलकर्णी यांनी नकार दिल्याने पथकाने त्यांचे मीटर काढून मेन सर्व्हिस वायर काढली.

वीज कनेक्शन कट केल्याचा राग आल्याने कुलकर्णी याने शिवीगाळ केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील केली. या वादात पाथरवट यांच्या शर्टाचा खिसा देखील फाटला. महावितरण कर्मचाऱ्यांना धमक्या देत पाथरवट यांना चापट मारली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button