इचलकरंजी : प्रेमसंबंधाला विरोध, पत्नी आणि मुलीने मिळून केला खून | पुढारी

इचलकरंजी : प्रेमसंबंधाला विरोध, पत्नी आणि मुलीने मिळून केला खून

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : दोघींच्या बाहेर असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध व त्यातून होणार्‍या वादातून शांतीनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघांनी मिळून खून केल्याचा पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याची माहिती आज शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. सुजाता शांतीनाथ केटकाळे ( वय 36) आणि साक्षी शांतीनाथ केटकाळे (वय 21) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. कबनूर येथे राहणारे शांतीनाथ केटकाळे यांचा लोखंडी कटावणी व बॅट तसेच चाकुने वार करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला.

खूनाच्या घटनेनंतर त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्या. त्यांनी हल्ल्याची घटना सांगितल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र हल्ल्यात जखमी झालेल्या शांतीनाथ केटकाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. सुजाता व साक्षी या दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. शांतीनाथ केटकाळे यांची पत्नी सुजाता यांचे तसेच मुलगी साक्षी हिचे बाहेर प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाच्या कारणावरून वारंवार वादविवाद होत होते.

या कारणातून चिडून दोघांनीही बॅट, चाकू, लोखंडी कटावणीने शांतीनाथ केटकाळे यांच्यावर घरात जोरदार हल्ला केला. त्यात त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद महावीर कल्लाप्पा केटकाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. साक्षी व सुजाता या दोघांनी बाहेर अफेअर असल्याच्या कारणावरून खून केला असला तरी आणखी कोणते कारण आहे का? याचाही शोध घेण्यात असल्याचे पो. नि. वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button