नाशिक : वन्यजीवांचे होणार सुरक्षित रेस्क्यू ; ‘नेटगन’ खरेदीची चाचपणी, वनविभागाचा दावा | पुढारी

नाशिक : वन्यजीवांचे होणार सुरक्षित रेस्क्यू ; 'नेटगन' खरेदीची चाचपणी, वनविभागाचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जंगल कमी झाल्याने अन्न-पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यातून वन्यजीव-मनुष्य संघर्ष होतो. मानवी वस्तीत आलेल्या वन्यजीवांना रेस्क्यू करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने डार्ट मारला जातो. त्यानंतरही वन्यजीवांना जाळीबंद करण्यासाठी कसरत करावी लागते. त्यातही दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर ’नेटगन’ खरेदीची चाचपणी केली जात असून, ’नेटगन’मुळे वन्यजीवांना सुरक्षित रेस्क्यू करणे शक्य होणार असल्याचा दावा वनविभागाने केला.

नाशिक जिल्ह्यात बिबट्या, वानर यांसारख्या वन्यजीवाचे मोठे वास्तव्य आहे. हे वन्यजीव शहरात येण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यासाठी सुसज्ज बचाव पथक तयार केला असले तरी ’डार्ट’ मारून बेशुद्ध केल्यावर जाळीबंद करण्यात अडचणी येतात. त्यामुळे वनविभागाने अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ’नेटगन’ खरेदीचा विचार वनविभागाकडून केला जात आहे. पहिलाच डार्ट मारल्यावर वन्यजीवांना जाळीबंद करण्यासाठी ’नेटगन’चा फायदा होईल.

’नेटगन’च्या माध्यमातून डार्ट बसलेला वन्यजीव पळून जाण्यापूर्वी अथवा हालचाल करण्यापूर्वी काही क्षणात त्याच्यावर मोठ्या जाळीची झडप पडेल. 12-13 मीटरवरून ’नेटगन’चा वापर करणे शक्य असून, 10 बाय 10 किंवा 15 बाय 15 या आकारात जाळी उपलब्ध आहे. दरम्यान, नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक कार्यालयात नुकतेच ’नेटगन’चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांच्यासह बचाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते. गनच्या खरेदीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर अधिकारी सकारात्मक असल्याचे समजते.

वन्यजीव रेस्क्यू करण्यासाठी ’नेटगन’ फायदेशीर ठरणार असून, गनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पुन्हा दोन-तीन वेळा प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. सर्व पथके आणि अधिकार्‍यांसोबत चर्चा करून नेटगन खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.– पंकज गर्ग, उपवनसंरक्षक

हेही वाचा :

Back to top button