खळबळजनक : धुळ्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

खळबळजनक : धुळ्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच परिवारातील चार आणि त्या परिवारात राहणाऱ्या अन्य एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. या सामूहिक आत्महत्येचा कारणाचा आता मोहाडी पोलिस तपास करत आहेत. या सर्व पाचही जणांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे राहणारे गणेश रावळ गोपाळ हे रोजगारासाठी धुळ्याच्या औद्योगिक वसाहती मध्ये आले होते. यासाठी त्यांनी अवधान गावात दौलत नगरमध्ये भाडेतत्त्वावर घर घेतले. आपल्या उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त असणाऱ्या या परिवारातील चौघे सदस्यांनी तसेच परिवारात राहणाऱ्या एका युवकाने एकाच वेळी विष प्राशन केल्याची माहिती गोपाळ यांनी त्यांच्या घर मालकाला दिली. यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घरात पाहिले असता गणेश रावल गोपाळ (वय 42), गोविंदा गणेश गोपाळ (वय 12), जयश्री गणेश गोपाळ(वय 14), सविता गणेश गोपाळ (वय 35 ) व भरत पारधी ( वय 24 ) यांना त्रास होत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एकाच परिवारातील पाच जणांनी विषप्राशन केल्याच्या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. ही माहिती मिळाल्याने मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे पथकासह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी या सामूहिक आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या पाचही जणांवर उपचार सुरू असल्याने त्यांची जबाब नोंदवण्यात अडचणी आल्या. दरम्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही अद्याप या सामुहिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. तूर्त या घटनेची मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा ;

Back to top button