बलशाली भारतासाठी मिळेल ऊर्जा : देवेंद्र फडणवीस ; नाशिकमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण | पुढारी

बलशाली भारतासाठी मिळेल ऊर्जा : देवेंद्र फडणवीस ; नाशिकमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

सिडको : पुढारी वृत्तसेवा
नाशिक मध्ये पाथर्डी फाटा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसून स्मारक आहे. या स्मारकातून बलशाही भारत बनविण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे. तसेच देशाच्या विकासासाठी भारतीय घटनेची रचना करून डॉ. आंबेडकरांनी मोठे उपकार केले आहेत, जे कधीही विसरता येणार नाहीत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर ‘जय भीम’ आणि डॉ. आंबेडकरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. नाशिक शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पाथर्डी फाटा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, रवि अनासपुरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी आमदार बाळासाहेब सानप, महापौर सतीश कुलकर्णी, महेश हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, जगन पाटील, अविनाश पाटील, शिवाजी बरके, नगरसेवक सतीश सोनवणे, दिनकर आढाव, मुकेश शहाणे, किरण दराडे, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, रश्मी हिरे, डॉ. चंचल साबळे, संतोष सोनपसारे, सुदाम कोंबडे, अनिल मटाले, अ‍ॅड. अतुल सानप, शेखर निकुंभ, सुनील जगताप, सोमनाथ बोराडे, प्रशांत खरात, विशाल दोंदे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक नगरसेवक राकेश दोंदे, नगरसेवक भगवान दोंदे यांनी केले. या वेळी नगरसेवक दोंदे यांनी, 34 वर्षांपासून पुतळा उभारण्यासाठी संघर्ष सुरू होता. अखेर मनपा, शासनाकडे पाठपुरावा करून सर्व विभागाच्या मंजुरीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्याने आनंद झाल्याचे सांगितले. प्रारंभी नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेवक राकेश दोंदे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस, ना. डॉ. भारती पवार व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पुतळ्याचे शिल्पकार विजय बुर्‍हाडे यांचा सत्कार ना. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ना. डॉ. पवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यातून प्रेरणा व ऊर्जास्रोत मिळते. डॉ. आंबेडकर यांचे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे अंगीकृत करावे व अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी अंबड व इंदिरानगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रुग्णवाहिकेला
मार्ग काढून दिला…
पाथर्डी फाटा येथे पुलाखाली व मागे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी हॉर्न वाजवत रुग्णवाहिका आल्याने भाषण सुरू असताना ना. फडणवीस थांबले व प्रथम रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग काढून देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा :

Back to top button