नंदुरबार : पोलीस दलात हेल्मेट सक्ती लागू! हेल्मेट विना आढळल्यास होणार कारवाई | पुढारी

नंदुरबार : पोलीस दलात हेल्मेट सक्ती लागू! हेल्मेट विना आढळल्यास होणार कारवाई

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना हेल्मेट वापरणे आजपासून सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट विना आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी म्हटले आहे की,  ” हेल्मेट विना आढळल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईलच शिवाय अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे. यामुळे आज अनेक पोलीस कर्मचारी लगबगीने हेल्मेट खरेदी करताना दिसले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात व पोलीस मुख्यालयात कामानिमित्त दुचाकी वाहनाने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा आदेश असल्याचे म्हटले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आवारात हेल्मेट परीधान करणे सक्तीचे करण्यात येत आहे.  १९ फेब्रुवारी २०२२ पासून  अधिकारी व पोलिस अंमलदार हे विना हेल्मेट पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय आवारात प्रवेश करणार नाहीत.

विना हेल्मेट दुचाकी चालवितांना पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय नंदुरबार आवारात आढळून आल्यास पोलीस कारवाई होणार आहे. निरीक्षक शहर वाहतूक शाखा, नंदुरबार यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, असे जिल्हा अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button