जीवघेण्या अपघातांपासून होणार रक्षण; गाडी चालवताना झोप आली तर हे डिव्हाईस करेल अलर्ट
पुणे : पुढारी वृत्तसेवा
रात्रीच्या वेळी वाहन चालवताना खूप सतर्कतेची आवश्यकता असते, कारण अनेक वेळा लांब पल्ल्याच्या प्रवासात थकवा आल्याने चालकाला झोप येते. त्यामुळे वाहनाचा तोल बिघडून मोठा अपघात होऊ शकतो. जे काही वेळा जीवघेणे ठरू शकते. या समस्येवर उपाय म्हणून नागपूरच्या गौरव सावलाखे यांनी असे एक उपकरण तयार केले आहे. जे तुम्हाला ड्रायव्हिंग करताना झोपल्यावर अलर्ट करेल आणि तुम्हाला अपघातापासून वाचवेल. त्याबद्दल जाणून घेऊया.
हे उपकरण लक्झरी वाहनांमध्ये आढळून येते
लक्झरी कारमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक हायटेक उपकरणे आहेत. वाहनाभोवती बसवलेल्या सेन्सर्सवरून आजूबाजूच्या गोष्टींची कल्पना घेऊन कारचा वेग मर्यादित करते. परंतु सामान्य गाड्यांमध्ये असे कोणतेही उपकरण नाही की, जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल आणि अपघात होत असताना वाहनाचा वेग कमी करेल. मात्र गौरव सावलाखे यांचे हे उपकरण सर्वसामान्य वाहनांना अपघातांपासून वाचवू शकते.
हे उपकरण कसे काम करते
गौरवच्या म्हणण्यानुसार, गाडी चालवताना हे उपकरण कानाच्या मागे ठेवावे लागते. हे सेन्सर, ३.६ व्होल्ट बॅटरीसह येते. या डिव्हाइसमध्ये ऑन-ऑफ स्विच आहे. जेव्हा ड्रायव्हरचे डोके स्टीयरिंग व्हीलच्या दिशेने ३० अंश झुकलेले असते, तेव्हा अलार्म डिव्हाइस कंपन करू लागेल आणि तुम्हाला सतर्क करेल. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले डोके ३० अंशाच्या कोनात झुकते आणि डिव्हाइस सक्रिय होते.
उपकरण तयार करण्याची कल्पना कशी सुचली
गौरवने सांगितले की, एकदा झोपेमुळे त्याचा कारला अपघात झाला होता. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर गाडी चालवताना झोप लागल्यावर तुम्हाला अलर्ट करण्यासाठी एक उपकरण डिझाइन करण्याची कल्पना त्याला सुचली.

