Murder : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दगडाने ठेचून खून, पतीला अटक
पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : दुसर्याचे शेत कसायला घेतलेला शेतकरी पत्नीसह बुधवारी (ता.16) रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून शेतातच त्यांच्यात झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा डोक्यात व तोंडावर दगडाने ठेचून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
डांगशिरवाडे (ता.साक्री) येथे भिल्ल आदिवासी समाजातील दिलीप हिराजी सोनवणे (वय 52) हा पत्नी मंडाबाई सोनवणे (वय 48) व मुला-मुलीसह राहतो. मात्र, पती दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाईवर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत असे. गावातील लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत तो नेहमी मंडाबाईशी वाद घालत असे. यावरून पती-पत्नीत सातत्याने कौटुंबिक कलह निर्माण होत असे. त्यांच्यातील ही भांडणे नित्याची झाली होती. दिलीप सोनवणे याने गावातीलच एकाचे शेत कसायला घेतले आहे. बुधवारी (ता.16) रात्री त्याच्यासह त्याची पत्नी मंडाबाई असे दोघेही शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातच त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या दिलीप सोनवणे याने तान्या डोंगर भिल याच्या गट क्रमांक 343/2 मधील शेताच्या बांधावर पत्नी मंडाबाईच्या डोक्यासह तोंडावर दगडाने मारहाण केली. यात त्याची पत्नी मंडाबाईचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी घटनेबाबत साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांना अवगत केले. त्यानंतर मैराळे यांनी पिंपळनेर गाठले. तेथून त्यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, उपनिरीक्षक भाईदास मालचे यांच्यासह पोलिस पथक संशयित दिलीप सोनवणेला घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी मृत मंडाबाईचा मृतदेह आज दुपारी उशिरा पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
या प्रकरणी पिंटू काळू गायकवाड (वय 40, रा. डांगशिरवाडे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलिस ठाण्यात दिलीप हिराजी सोनवणे यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मृत मंडाबाईचा पती दिलीप सोनवणेला ताब्यात घेतले असून, दुपारी उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कारवाई सुरू होती. पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे तपास करत आहेत.
पोलिस वाहन पोहोचल्यावर खुनाचा उलगडा
डांगशिरवाडे येथील दिलीप सोनवणे याने बुधवारी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यानंतर पत्नीचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दगडाने ठेचून खून केला. ही बाब आज सकाळपर्यंत ग्रामस्थांना माहिती नव्हती. दरम्यान, पोलिसांचे वाहन आज सकाळी गावात पोहोचल्यानंतर गावात खुनाची घटना घडल्याचे ग्रामस्थांना माहिती झाले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

