पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) हंगामासाठी श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कर्णधार म्हणून नियुक्ती जाहीर केली. तो इंग्लंडचा खेळाडू इऑन मॉर्गनची जागा घेणार आहे. केकेआरने आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या आठवड्यात झालेल्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला फ्रँचायझीने १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (DC) नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी केली आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
केकेआरने ट्विट करून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कर्णधार झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. मेगा लिलावात अय्यरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती आणि त्याला केकेआरने १२.२५ कोटींना विकत घेतले. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याचे मानधन ७ कोटी रुपये होते.
२०२० च्या आयपीएल हंगामात दिनेश कार्तिक हा कोलकाताचा कर्णधार होता, परंतु संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने मधल्या स्पर्धेतून कर्णधारपद सोडले आणि इऑन मॉर्गनला संघाचा नवा कर्णधार बनवले. यावेळी कोलकाताने कार्तिक आणि मॉर्गन या दोघांनाही रिटेन केलेले नाही.
श्रेयस अय्यरने यापूर्वी ३ हंगामात दिल्लीचे कर्णधारपद भूषवले आहे. २०१९ मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सहा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये, संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने श्रेयसच्या दिल्ली संघाचा ५ गडी राखून पराभव केला होता.
कर्णधार म्हणून अय्यरने (Shreyas Iyer) ४१ सामने खेळले आहेत. यातील २१ सामन्यात विजय तर १८ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. २०२१ मध्ये, दुखापतीमुळे अय्यरला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला दिल्लीने कर्णधार बनवले.
केकेआरचे (KKR) कर्णधारपद स्वीकारताना श्रेयस अय्यर म्हणाला, 'केकेआरसारख्या प्रतिष्ठित संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने माझा एकप्रकारे सन्मानच झाला आहे. आयपीएल ही स्पर्धा विविध देशातील सर्वोत्तम खेळाडूंना एकत्र आणते आणि मी या प्रतिभावान लोकांच्या गटाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. मला या संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी केकेआर (KKR)चे मालक, व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचारी यांचे आभार मानू इच्छितो आणि मला विश्वास आहे की आम्ही संघाचे ध्येय साध्य करण्यासाठी योग्य संयोजन करू.'
केकेआरचे (KKR) प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाले, 'श्रेयस अय्यरने केकेआरची सूत्रे हाती घेतल्याबद्दल मी खूप उत्साहित आहे. मी श्रेयसच्या खेळाचा आणि त्याच्या कर्णधार कौशल्याचा दुरूनच आनंद घेतला आहे. आता मी जवळून त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. केकेआरच्या यशासाठी आम्ही जोरदार प्रयत्नशील आहे.'
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा आयपीएलमधील सर्वात ग्लॅमरस संघांपैकी एक आहे. या संघाने आतापर्यंत २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. २०२१ मध्ये देखील, इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली. पण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता श्रेयस अय्यरकडून कोलकाता संघाला आयपीएल विजेतेपदाच्या खूप आशा असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.