धुळे पुढारी वृत्तसेवा : दोंडाईचा येथे झालेल्या दंगलीतील फरार मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सेंधवा येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिस पथकाने आता त्याला बेड्या ठोकल्या आहे.
दोंडाईचा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न 31 मार्च 2019 रोजी निर्माण झाला होता. यावेळी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याने त्याला दोंडाईचा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी देखील रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाली. या जमावाने केलेल्या मारहाणीत शाबाद शहा गुलाब शहा याचा खून झाला होता. यासंदर्भात जुबेर शेख नजीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधित तेरा जण व इतरांवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादवि कलम 302, 143, 147, 148 ,149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी चेतनसिंग महेंद्रसिंग राजपूत हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. यातच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस नाईक कुणाल पाटील, संतोष हिरे, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील व गुलाब पाटील यांनी सेंधवा येथील हॉटेल शांती पॅलेसमध्ये सापळा लावला. या हॉटेलमधून राजपूत याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. न्यायालयाने त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून हा आरोपी पोलिस पथकाला गुंगारा देत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.