फ्लॅशबॅक : नाशिक महापालिकेची 1987 मध्येच झाली होती वॉर्डरचना

फ्लॅशबॅक : नाशिक महापालिकेची 1987 मध्येच झाली होती वॉर्डरचना
Published on
Updated on

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ : नाशिक महापालिकेसह 10 महापालिकांची पहिली निवडणूक 1987 मध्येच झाली असती. परंतु, काही कारणास्तव नाशिक मनपाची पहिली पंचवार्षिक निवडणूक 1992 मध्ये झाली आणि इतर नऊ महापालिकांची निवडणूक मात्र 1987 मध्येच झाली. विशेष म्हणजे 1987 च्या निवडणुकीसाठी नाशिक महापालिकेची वॉर्डरचना जाहीर होऊन आरक्षणदेखील पडले होते. त्यासाठी अनेक उमेदवारांनी तयारीदेखील केली होती.

नाशिक मनपातील प्रशासकीय काळ संपल्यानंतर 1992 मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्षांच्या मदतीने काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेत आली. पहिल्याच निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्याने महापौर निवडणुकीत मोठी उलथापालथ झालेलीही याच निवडणुकीत दिसून येते. 92 च्या निवडणुकीत 28 नगरसेवक हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यातील 18 अपक्ष नगरसेवक हे काँग्रेससोबत होते. त्यामुळेच काँग्रेसचे पहिले महापौर होण्याचा मान शांतारामबापू वावरे यांना मिळाला. सलग दोन वर्षे ते महापौरपदी राहिले. त्यानंतर महापौरपदाच्या खुर्चीवर माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब अरिंगळे बसावे, अशी इच्छा नाशिकरोडचे काँग्रेसचे नगरसेवक दिनकर आढाव (विद्यमान भाजप नगरसेवक) यांच्यासह अपक्ष नगरसेवकांनी व्यक्त केली. परंतु, अरिंगळे यांच्याऐवजी पंडितराव खैरे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर 1995-96 मध्ये पुन्हा अरिंगळे यांच्या नावाचा आग्रह झाला. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून वेगळीच भूमिका घेतल्याने काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होऊन अपक्षांच्या मदतीने 'ब' गट स्थापन करण्यात आला.

काँग्रेस पक्षाने प्रकाश मते यांना उमेदवारी दिली. तर अपक्षांच्या गटातून माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात अपक्षांच्या पाठिंब्यामुळे 'ब' गटाचे ढिकले हे महापौर झाले आणि त्यापुढील काळात 1996-97 ला काँग्रेसचे प्रकाश मते हे महापौर झाले. महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना नाशिकरोड विभागावरील अन्याय दूर व्हावा म्हणून आप्पासाहेब अरिंगळे, प्रभाकर शिंदे यांच्या मदतीने दिनकर आढाव यांनी शहर सुधार समिती स्थापन करत त्या माध्यमातून काम सुरू केले. समितीच्या माध्यमातून होणारी कामे पाहून त्यावेळचे काँग्रेस नेते डॉ. वसंतराव पवार यांनी दिनकर आढाव यांना उमेदवारी दिली आणि पहिल्या निवडणुकीपासून ते 2017 च्या निवडणुकीपर्यंत (2012 चा अपवाद वगळता) आढाव हे मनपात कार्यरत आहेत. ढिकले यांच्या महापौरपदाच्या उमेदवारीसाठी अपक्ष 18 नगरसेवकांसह भाजप 10 आणि शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याची आठवण दिनकर आढाव यांनी करून दिली.

अन् आयुक्तांच्या दरवाजाला धडका
1993 मध्ये नाशिक महापालिकेत आयुक्त असलेले जे. पी. डांगे यांची कारकीर्द गाजली होती. आपण बोलविल्याशिवाय नगरसेवकांना आत सोडायचे नाही, अशी तंबीच डांगे यांनी कर्मचार्‍यांना दिली होती. यामुळे नागरी कामे घेऊन जाणार्‍या लोकप्रतिनिधींना तासन्तास ताटकळत बसून राहावे लागे. तरीही आत बोलावले जाईल असे नाही. यावर उपाय म्हणून महापौर शांतारामबापू वावरे यांनी आपल्या काही मोजक्या नगरसेवकांना कानमंत्र दिला आणि दुसर्‍याच दिवशी आयुक्तांच्या दरवाजाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी धडका दिल्या. या घटनेनंतर मात्र आयुक्तांचे दरवाजे नगरसेवकांना खुले झाले, अशी आठवणही नगरसेवक दिनकर आढाव यांनी सांगितली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news