नाशिक : असा झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून ; पतीने सोबत नेण्यासाठी केला होता भलताच बहाणा | पुढारी

नाशिक : असा झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून ; पतीने सोबत नेण्यासाठी केला होता भलताच बहाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांचे पती संदीप वाजे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी देण्याच्या बहाण्याने महामार्गावर बोलवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यासंदर्भात संदीपने पत्नी डॉ. सुवर्णा यांना सकाळी व सायंकाळी केलेले फोन, महामार्गावर दोघांचे मिळालेले मोबाइल टॉवर लोकेशन यामुळे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. दरम्यान, संदीप याने पत्नीसोबतचे मोबाइल रेकॉर्डिंग डिलिट केल्याने पोलिस ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाडिवर्‍हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या कारमध्ये एका महिलेचा पूर्ण जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याचे व त्यांचा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयावरून डॉ. सुवर्णा यांचे पती संदीपला अटक केली. प्राथमिक तपासात कौटुंबिक कलहातून संदीपने पत्नीचा खून केल्याचे समोर आले. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या क्लिनिकमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत संदीपला फारकत देण्याच्या मोबदल्यात 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा उल्लेख आढळून आला. त्यामुळे पैसे न देता डॉ. वाजे यांचा खून करून दुसरा विवाह करण्याचा प्रयत्न संदीपचा असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

दरम्यान, 25 जानेवारीला घटनेच्या दिवशी संदीपने सकाळच्या सुमारास पत्नी डॉ. सुवर्णा यांना फोन करून नवीन गाडी घेतल्यामुळे पार्टी करण्यास सायंकाळी बोलवले होते. ही बाब डॉ. सुवर्णा यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही सांगितली होती.

त्यामुळे त्यांची मुलेही आई-वडिलांसोबत जेवणासाठी बाहेर जायचे या आंनदात आईची घरी वाट पाहत होते. मात्र, सायंकाळी संदीपने फोन करून डॉ. सुवर्णा यांना ऑफिसहून परस्पर महामार्गावर बोलवून घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानुसार डॉ. वाजे या महामार्गावर संदीप यांची भेट घेतली. मात्र, तेथून पुढे संदीप व डॉ. सुवर्णा वाजे यांचा प्रवास कुठे व कसा झाला याचा शोध पोलिस घेत आहेत. दोघांच्याही मोबाइलचे लोकेशन महामार्गावर दिसत असले तरी त्यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. महामार्गावरील परिसरातच डॉ. सुवर्णा यांचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा :

Back to top button