धुळे : हरवलेल्या व्यक्तीची हाडे वन विभागाच्या परिसरात सापडल्याने खळबळ

धुळे : हरवलेल्या व्यक्तीची हाडे वन विभागाच्या परिसरात सापडल्याने खळबळ

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील निमडाळे येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हाडे वन विभागाच्या परिसरात सापडली. या व्यक्तीचा मृतदेह जंगली श्वापदानी खाल्ला असावा असा प्राथमिक अंदाज असून या भागांमध्ये त्याच्या शरीराचे उर्वरित अवयव शोधण्याचे काम पोलीस पथकाने केले.

धुळे तालुक्यातील निमडाळे येथे राहणारे शालिग्राम सोनवणे (वय 57) हे 15 जानेवारीपासून घरातून निघून गेले होते. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी परिसरामध्ये त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून न आल्याने पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात हरवल्याची माहिती देण्यात आली. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

निमडाळे परिसरातील वन विभागाच्या हद्दीमध्ये गुरे चारणाऱ्या एका युवकाला कपडे आणि हाडे पडल्याचे दिसून आल्याने त्याने ही माहिती संबंधितांकडून पश्चिम देवपूर पोलिसांना कळवले. त्‍यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आढळलेल्या कपड्यांची पाहणी केल्यानंतर त्यांनी सोनवणे यांच्या नातेवाईकांना कपडे आणि अन्य वस्तू दाखवल्या. त्यावरून ही हाडे सोनवणे यांची असल्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान सायंकाळी देखील या भागात फॉरेन्सिक विभागाने तपासणी केली आहे. त्याच प्रमाणे पोलिस पथकाने निमडाळे परिसरातील जंगलात सोनवणे यांचा शरीराचे अन्य अवयव शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोनवणे यांच्या कपड्यांची अवस्था पाहता त्यांचा मृतदेह जंगली श्वापदं यांनी खाल्ला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान शरीराचे अवशेष शोधून काढण्याकामी वन विभागाला याबाबत पत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोनवणे यांची अंतिम ओळख पटवण्यासाठी हाडांची डी एन ए टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news