

पुणे : पुढारी ऑनलाईन
बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले. एकेकाळी लाखो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या बजाज चेतक, बजाज सुपर आणि बजाज प्रिया या स्कुटरचे ते जनक होते. बजाज या कंपनीला विविध संकटातून सावरत कंपनीला एका मोठ्या उंचीवर नेण्यात बजाज यांचे मोठे योगदान होते.
बजाजची स्कुटर दारात असणे हे एके काळी प्रतिष्ठेचे होते. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी किमत, चांगले मायलेज, मेंटनेन्सचा फारसा खर्च नाही, सामान ठेवण्यासाठी डिक्की, स्कुटर कुठे पंक्चर झालीच तर जोडीने स्टेफनीही असा थाट या तिन्ही स्कुटरचा होता. मागच्या सीटवर एक व्यक्ती किंवा दोन लहान मुले आणि पुढच्या रिकाम्या जागेत एक लहान मूल उभे राहील अशी जागा होती. त्या काळातील मध्यमवर्गीय भारतीयांसाठी बजाजची स्कुटर ही कारपेक्षा कमी नव्हती. अगदी ग्रामीण भागातील लोकांनाही स्कुटर अपील व्हायची, कारण शेतीतील कामांसाठी आवश्य सामान या स्कुटरवरून नेता येत असे. (Rahul Bajaj)
टू स्ट्रोक इंजिनाचा मेटेनन्स अगदी किरकोळ होता. जवळपास नव्हताच असे म्हटले तरी चालेल. बजाजचे स्कुटरचे इंजिन त्याकाळातील सर्वोत्तम इंजिन मानले जात होते. गाडीची गुणवत्ता बजाज यांनी इतकी चांगली ठेवली होती की चेतक पंक्चर झाली तरच गॅरेजमध्ये न्यायला लागत असे. (Rahul Bajaj)
कधी किक बसली नाही तर गाडी थोडी तिरकी केली की लगेच किक बसायची. बजाजने विमान लाँच केले तरी सुरू करण्यासाठी तिरके करावे लागते असा विनोद त्या काळी प्रसिद्ध होता. (Rahul Bajaj)
एकूणच काय तर विश्वासार्ह म्हणून बजाजच्या स्कुटरची ओळख बनली होती. या स्कुटरची प्रसिद्धी इतकी होती की हुंड्यातही अनेकांना स्कुटर मिळत असे. (Rahul Bajaj)
बजाज आणि व्हेस्पा या कंपनीत परस्पर सहकार्य करार होता. व्हेस्पाने दिलेल्या डिझाईनवर चेतकची निर्मिती १९७२ला राहुल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्या वेळच्या लायसन्सराज कोटा सिस्टममुळे उत्पादन फार वाढवता येत नव्हते. त्यामुळे चेतक स्कूटरसाठी मोठे वेटिंग होते. अगदी १० वर्षांपर्यंतही वेटिंग असायचे आणि लोक तेवढा काळ या स्कुटरसाठी वाट पाहायाचे. लुधियानातील एका डिलरने एकाच दिवशी ५०० चेतकीची डिलिव्हरी दिल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. (Rahul Bajaj)
महाराण प्रताप यांच्या घोड्याचं नाव चेतक होते. प्रामाणिकपणा आणि शक्तीचं प्रतीक म्हणजे हा चेतक घोडा होता. त्याचेच नाव बजाजच्या या स्कुटरला देण्यात आले होते. (Rahul Bajaj)
चेतक बाजारात असतानाच बजाज यांनी प्रिया आणि सुपर या दोन स्कुटर लाँच केल्या त्याही बाजारात हिट ठरल्या.
१९९१नंतर भारतात विविध कंपन्या येऊ लागल्या. तर पेट्रोलच्या किंमतीही वाढू लागल्या होत्या. त्यामुळे वापरण्यासाठी कितीही सुटसुटीत असल्या तरी स्कुटरची मागणी कमी होऊ लागली होती. आणि बाजारात मोटरसायकल्सची मागणही वाढू लागली. त्यानंतर २००५ला बजाज चेतकचं उत्पादन थांबवण्यात आले. २०१९ला कंपनीने बजाज चेतक याच नावाने इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली आहे. (Rahul Bajaj)
राहुल बजाज यांनी मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या वाहतुकीची त्या वेळेची गरज पूर्ण करणारी दुचाकी बनवली होती, त्यामुळे खरोखरच बजाजची स्कुटर म्हणजे हमारा बजाज बनली होती.