सिडको : राजेंद्र शेळके : मनपाच्या नवीन प्रभागरचनेनुसार, गोविंदनगर ते जुने सिडको परिसर नवीन प्रभाग क्रमांक 30 आहे. यात पूर्वीचे प्रभाग 24 मधील 80 टक्के व प्रभाग 25 च्या काही भागांचा समावेश आहे. आगामी मनपा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या प्रभागात शिवसेनेकडून तीन जागांसाठी पाच प्रबळ दावेदार आहेत.
प्रभाग क्रमांक 30 हा दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे. नगरसेवकांनी प्रभागातील रस्ते, पाणी, पथदीप, अभ्यासिका या मूलभूत सुविधा सोडविण्याचा प्रयत्न केला असला तरीही काही ठिकाणी कचरा, सांडपाणी, पथदीप उद्याने, ड्रेनेज समस्या 'जैसे थे' च आहे. आगामी मनपा निवडणुकीत विद्यमान शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे, नगरसेवक प्रवीण तिदमे यासह माजी नगरसेविका सीमा बडदे, शिवानी पांडे, बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड, कैलास चुंभळे, शंकर पांगरे, स्वप्नील पांगरे, सुशील बडदे इच्छुक आहेत. भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून रश्मी हिरे, जगन पाटील, शैलेश साळुंखे, राहुल गणोरे, रवि पाटील, यशवंत नेरकर, राम पाटील, वैभव बडदे, जगू पांगरे, शीतल विसावे, शीला पारनेरकर आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक राजेंद्र महाले यांसह अमोल महाले, अमर वझरे, सुनील अहिरे, सागर मोटकरी, तर काँग्रेसकडून अश्विनी बोरस्ते, अशोक टिळे, पवन टिळे तसेच, मनसेकडून विजय रणाते, अक्षय खांडरे, हरीश पांगरे आदी इच्छुक आहेत.
असा आहे प्रभाग 30
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, खांडे मळा, बडदेनगर, लेखानगर, लक्ष्मीनगर, भुजबळ फार्म, इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 2, अचानक चौक, शिवाजी चौक, अनमोल नयनतारा.
समस्या –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाची दुरवस्था * ठाकरे उद्यान ते तिडके कॉलनीकडे जोडल्या जाणार्या रस्त्याची दुरवस्था * साडेचार कोटी रुपये खर्च करून बडदेनगर ते पाटीलनगर डीपी रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले * वंदे मातरम चौक परिसर, शनेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, सावरकर चौक यासह अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार * खोडे मळ्यातील कॉलनी परिसरात अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे * शॉपिंग सेंटर येथे भाजीविक्रेत्यांमुळे अतिक्रमण.
मनपाने जुने सिडकोतील ठाकरे उद्यानाचा विकास करावा. तेथे मुलांना खेळण्यासाठी विविध मैदाने उभारली पाहिजे. तसेच उद्यानाजवळील चौफुलीवर कायम अपघात होतात. त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे. – नाना जाधव, अध्यक्ष,
सिडको व्यापारी संघटना
वंदे मातरम चौक परिसर, शनेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, सावरकर चौक यासह अनेक ठिकाणी गेल्या20 ते 25 वर्षांपासून ड्रेनेज लाइन न बदलल्याने ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडतात. या भागात मोठ्या व्यासाचे ड्रेनेज पाइपलाइन टाकावी. – पुष्कराज दंडगव्हाळ, नागरिक
वंदे मातरम चौक येथे असलेल्या मनपा दवाखान्यात नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. या भागात कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. या कामगारांना दवाखान्याचा उपयोग होईल.
– अरुण अभंग, नागरिक
साडेचार कोटी रुपये खर्चून जुने सिडकोतील बडदेनगर ते पाटीलनगर डीपी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, भूसंपादनाअभावी अजूनही रस्त्याचे काम रखडले. अर्धवट रस्ता झाल्याने नागरिकांना रस्त्याचा वापर करता येत नाही. मनपाने रस्त्याची जागा ताब्यात घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे. – प्रसाद जाधव, नागरिक
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.