नाशिक : म्हाडाच्या परीक्षेत तोतया परीक्षार्थी ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा | पुढारी

नाशिक : म्हाडाच्या परीक्षेत तोतया परीक्षार्थी ; न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी बुधवारी (दि.९) झालेल्या सरळ सेवा परिक्षेत तोतया परिक्षार्थीस मोबाइलसह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मुळ परिक्षार्थी, तोतया परिक्षार्थी व त्यांना मदत करणाऱ्या आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाडाचे अधिकारी आशिष मनोहर आंबेकर (३८, रा. गंधर्व नगरी, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि.९) म्हाडाच्या विविध पदांसाठी शहरातील परिक्षा केंद्रावर ऑनलाइन परिक्षा घेण्यात आल्या. यावेळी इंदिरानगर येथील गुरुगोविंद सिंग काॅलेजमधील केंद्रात दुपारी १२.३० ते २.३० दरम्यान लिपीक पदासाठी परिक्षा होत होती. त्यावेळी परिक्षार्थींना तपासणी करून केंद्रात सोडत होते. त्यावेळी चोटीराम सिताराम बहुरे नामक परिक्षार्थीच्या ऐवजी ज्ञानेश्वर श्रीमंत डिघुळे (२२, रा. घोडेगाव, जि. औरंगाबाद) हा युवक केंद्रात जात असल्याचे आढळून आले. हॉल टिकीट आणि आधारकार्डवरील फोटाे जुळत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. तसेच ज्ञानेश्वरकडे मोबाइल व ईलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आढळून आले. तर दुपारी एकच्या सुमारास संशयित योगेश सिताराम बहुरे (२३, रा. घोडेगाव, जि. औरंगाबाद) हा देखील परिक्षा केंद्रातील प्रतिबंधित क्षेत्रात मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस बाळगताना आढळून आला.

त्यामुळे पथकाने तोतया परिक्षार्थी ज्ञानेश्वर डिघुळे व त्यास मदत करणारा योगेश बहुरे या दोघांनाही ताब्यात घेत इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही शनिवारपर्यंत (दि.१२) पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस चोटीराम बहुरे याचा शोध घेत आहेत.

मोबाईलवर माहिती

पोलिसांच्या प्राथमिक तपासात तोतया परिक्षार्थी ज्ञानेश्वर यास संशयित चोटीराम बहुरे हा परिक्षा देण्याच्या मोबदल्यात पैसे देणार असल्याचे समोर येत आहे. तसेच परिक्षा देताना ज्ञानेश्वरला मोबाइलवरून माहिती पुरवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button