लासलगाव : रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्यांची मनमानी ; प्रवाशी त्रस्त | पुढारी

लासलगाव : रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्यांची मनमानी ; प्रवाशी त्रस्त

लासलगाव वार्ताहर : केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास लासलगाव रेल्वे बुकिंग ऑफिसकडून नकार मिळत असल्याने ग्राहक मात्र चक्रावले आहेत. येथील रेल्वे स्थानकातील बुकिंग अधिकारी प्रवाश्यांशी नीट बोलत नाही, सुट्या पैशांवरून गोंधळ घालणे, रिझर्व्हेशन वरून नेहमी प्रवाश्यांना त्रास देणे अश्या एक ना अनेक तक्रारी येत आहे. यासंबधी तक्रार करुनही काही फरक पडलेला दिसत नाही.

येथील लोकप्रतिनिधी प्रवाश्यांना आवाहन करतात की त्यांनी तिकिटे, रिझर्व्हेशन हे लासलगाव रेल्वे स्थानकावर करावे, जेणेकरून लासलगाव रेल्वे स्थानकाचा व्यवसाय दिसेल. याला प्रवाशी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मात्र हे सरकारी बाबु नागरिकांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रिझर्व्हेशन तिकीट साठी कार्ड पेमेंट चालणार नाही तर थेट रोख पैशांची मागणी केली जात आहे. तिकीट खिडकीवर मोठ्या अक्षरात सर्व प्रकारचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील असे नोटिफिकेशन लावलेले असतांना अधिकारी मात्र रेल्वेच्या नियमाची पायमल्ली करत आहे. जर कार्ड पेमेंट बंद झाले आहे, तर नोटिफिकेशन काढण्याची तसदी सुद्धा या महाशयांनी केली नसल्याचे नागरिक सांगत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकारने ऑनलाइन व्यवहाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रेल्वे बोर्डानेसुद्धा रिझर्व्हशन तिकीट साठी कार्डाच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा दिली होती. नागरिकांनी डेबिट आणि क्रेड‌िट कार्ड, ऑनलाइन बँक‌िंगसारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत आपल्या गरजा भागविण्यास सुरुवात केली आहे. मात्र रेल्वे तिकीट बुकिंग साठी रोख रकमेची मागणी केली जात असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button