गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी साक्रीतून तीन संशयितांना अटक ; तीन जिवंत काडतुसे जप्त | पुढारी

गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी साक्रीतून तीन संशयितांना अटक ; तीन जिवंत काडतुसे जप्त

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री येथील अनुपार्क हॉटेलवर गावठी कट्टा घेवून तरूण बसला असल्याची गुप्त खबर एलसीबीचे निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली असता त्यांनी लागलीच वरिष्ठांना सुचित करून फौजफाट्यासह साक्री गाठले. मिळालेल्या माहितीतील तरुण या पथकाच्या हाती लागलाच मात्र अधिक चौकशीत त्याचे आणखी दोघे साथीदारही उघड झाल्याने पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. शिवाय त्यांच्या जवळील गावठी कट्ट्यासह तिन काडतुसे जप्त करीत गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीचे निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना दुपारी अडीचच्या सुमारास माहिती मिळाली की, साक्री येथील दिनेश गोटु पगारे हा गावठी कट्टा कब्जात बाळगून हॉटेल अनुपार्क येथे बसलेला आहे. ही माहिती लागलीच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना कळवून सपोनि.प्रकाश पाटील, पोसई.बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ.श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश चव्हाण, तुषार पारधी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयुर कैलास पाटील, महेंद्र सपकाळ, महाजन यांना सोबत घेवून तडक साक्री गाठले दुपारी ३.४० च्या सुमारास साक्री येथील हॉटेल अनुपार्क येथे एलसीबीचे पथक पोहचले.

त्यावेळी पोलिसांना हवा असलेला तरूण तेथे बसलेला सापडला. पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दिनेश छोटू पगारे (वय १९ रा.गढी भिलाटी साक्री) असे सांगितले. तर कट्ट्याबाबत विचारणा केली असता तो घरी ठेवला असल्याची कबूली दिली. तेव्हा पोलीस त्याला घेवून त्याच्या घरी पोहचले. यावेळी दिनेशने घरातील गावठी कट्टा काढून देतानाच तीन राऊंड मॅग्झीन ऋषीकेश अहिरे याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस आदर्श नगरात पोहचले.  आदर्श नगरातील गावठी कट्ट्यासह ऋषीकेश ज्ञानेश्वर अहिरे (वय.१९ रा.आदर्श नगर साक्री ) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ऋषीकेशने पोलिसांना घरातील तीन राऊंड काढून दिले.

गावठी कट्टा आला कोठून ?  याचा शोध घेतला असता आणखी एकाकडे अंगुलीनिर्देश झाला. सदरचा गावठी कट्टा व राऊंड हे महिर येथील सचिन नानाभाऊ काकुस्ते याच्याकडून घेतल्याची कबूली या दोघांनी दिली. पोलीस लागलीच सचिनच्या शोधात निघाले. पोलीस आपल्या मागावर आहेत, याची जरासीही कल्पना नसलेला सचिन महिर  एलसीबीला अखेर सापडलाच. सोबत असलेल्या दोघांनी हाच सचिन असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली. २६ वर्षीय सचिननेही गावठी कट्टा व काडतुसे दिनेशसह ऋषीकेशला दिल्याची कबूली दिल्याने सायंकाळी ५.२० च्या सुमारास त्यालाही ताब्यात घेण्यात आले. एलसीबीच्या या कारवाईत २५ हजार रूपये किंमतीच्या गावठी कट्ट्यासह १५०० रूपये किंमतीची तीन काडतुसे मिळून २६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिवाय एलसीबीचे पो.ना.योगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या तिघांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button