अमित शहांचा मास्टरस्ट्रोक | पुढारी

अमित शहांचा मास्टरस्ट्रोक

ज्ञानेश्वर बिजले

जयंत चौधरी यांनी चुकीचे घर निवडले. त्यांना आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत, हे आवाहन भाजपचे राजनितीचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत जाट नेत्यांच्या बैठकीत केले आणि पश्चिम उत्तरप्रदेशच्या राजकारणात त्यांच्या पडसादाच्या प्रचंड लाटा उसळल्या. त्यावर वाद-प्रतिवाद सुरू झाले. राजकारणाची दिशा आपल्याला हव्या त्या दिशेने वळविण्याचे शहा यांचे कौशल्य पुन्हा एकदा दिसून आले. राजद-सप आघाडीचे नेते त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद करताना त्यांची आघाडी एकसंध राखण्यासाठी धडपडू लागले आहेत.

उत्तरप्रदेशात बलाढ्य भाजपसमोर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लहानमोठ्या पक्षांशी आघाडी करीत मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपच्या कोणत्याही चालींना प्रतिसाद न देता, आपण आखलेल्या चालीवर भाजपला खेळण्यास भाग पाडण्यात अखिलेश आत्तापर्यंत यशस्वी ठरले. मात्र, शहा यांनी टाकलेला नवा डाव त्यांच्या आघाडीला भारी पडणार, अशीच सध्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, अखिलेश आणि राजदचे नेते जयंत चौधरी मुझफ्फरनगरला एकत्र पोहोचत आहेत, त्याचवेळी शहा यांनी मथुरेत प्रचाराला प्रारंभ केला आहे.

पहिल्या टप्प्याच्या मतदानावर लक्ष

उत्तरप्रदेशातील निवडणुकीचे पहिले दोन-तीन टप्पे पश्चिम उत्तरप्रदेशात आहेत. या भागात गेल्या तीन निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवित देशात व राज्यात सत्ता मिळविली. या यशात मुख्य वाटा होता तो हिंदू -मुस्लीम ध्रुवीकरणाचा. मुझफ्फरनगरमध्ये 2013 मध्ये झालेली दंगल ही त्याला कारणीभूत ठरली होती. त्यामुळे जाट समाज पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभारला, तर जाटांचा पक्ष म्हणून मानल्या गेलेल्या राष्ट्रीय लोकदलाचे काहीही स्थान शिल्लक राहिले नाही. मात्र, गेले वर्षभर दिल्लीच्या गाझीपूर सिमेवर शेतकरी आंदोलनाला बसले. त्या शेतकऱ्यांना भाजपने अव्हेरले, तर राजदचे नेते जयंत चौधरी यांनी वर्षभर आंदोलनाला साथ दिली. या आंदोलनामुळे राजदचे पुर्नरुज्जीवन झाले.

त्यातच राजद-सप आघाडी झाल्याने, पश्चिम उत्तरप्रदेशातील जाट व मुस्लीम समाजाची मते एक झाली. त्यांची संख्या 45 टक्के असल्याने, भाजपच्या पाया खालची वाळू सरकली. अशा कठीण प्रसंगी, जयंत चौधरींना साद घालीत, शहा यांनी पुन्हा विरोधी आघाडीतील संवादात गोंधळ निर्माण करण्याचे काम लिलया केले. दंगलीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भाजपचे नेते पुन्हा जाट समुदायाला त्यांच्यामागे उभे करण्याचा प्रयत्नाला लागले.

पश्चिम उत्तरप्रदेशाची राजकीय स्थिती

जाटांना का महत्त्व आहे, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी पश्चिम उत्तरप्रदेशातील गेल्या चार निवडणुकांतील राजकीय स्थिती अभ्यासली पाहिजे. सपची सत्ता 2012 मध्ये उत्तरप्रदेशात आली. त्यावेळी पश्चिम उत्तरप्रदेशातील 136 जागांपैकी सपकडे 58, भाजपच्या 20, बसपच्या 39, तर अन्य पक्षांकडे 19 जागा होत्या. 2013 मध्ये मुझफ्फरनगरची दंगल झाली. त्यानंतर वर्षभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीला शहा भाजपचे उत्तरप्रदेशचे प्रभारी होते. दंगलीचा वापर करीत त्यांनी केलेल्या ध्रुवीकरणामुळे राज्यातील 80 पैकी 71 जागा भाजपने जिंकल्या. त्यात पश्चिम उत्तरप्रदेशातील 27 पैकी 25 जागांचा समावेश आहे. केवळ दोन जागा सपला मिळाल्या. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा प्रभाव राहिला. पश्चिम उत्तरप्रदेशात 136 जागांपैकी भाजपने 103, सपने 27, तर अन्य पक्षांनी केवळ सहा जागा मिळविल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सप-बसपची आघाडी होऊनही त्यांना अनुक्रमे केवळ चार व तीन अशा सात जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपचे वीस खासदार निवडून आले. आता मात्र भाजपची दमछाक होऊ लागली आहे, त्यामुळे, या भागात कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी त्यांचे नेते जिवाची पराकाष्ठा करू लागले आहे. याला कारण ठरले ते गेले वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन.

शेतकरी आंदोलनाचे पडसाद

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला पहिल्यांदा विरोध झाला तो पंजाब व हरियानातील शेतकऱ्यांचा. त्यांच्या पाठिशी उभे राहिले, ते पश्चिम उत्तरप्रदेशातील शेतकरी. हे जाटांचे आंदोलन आहे, अशी अवहेलना त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी केली. त्यांच्यावर कारवाईचे पाऊल राज्य सरकारने उचलले, तेव्हा मध्यरात्री माध्यमांच्या कॅमेऱ्यापुढे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तोच ठरला या आंदोलनाचा टर्निंग पाँईंट.टिकैत हे जाट नेते. गाझीपूर सिमेवर जाट शेतकरीच वर्षभर आंदोलनात होते. जाट समाज खूप स्वाभिमानी. त्यांना अपमान सहन होत नाही. टिकैत रडले आणि स्वाभिमानी जाट शेतकरी पेटून उठले. आंदोलनाचा

वणवा भडकला. हरियाना, उत्तरप्रदेशात जाटांचे आंदोलन तीव्र झाले. सुमारे सातशे शेतकऱ्यांचे बळी गेले. त्याचवेळी लखीमपूरची दुर्दैवी घटना घडली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनीच्या मुलाचे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याने, आठजण मृत्युमुखी पडले. त्याचे पडसाद देशभर उमटले.उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने, शेतकऱ्यांचा जोरदार विरोध लक्षात घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांचा राग अद्यापही धुमसतच आहे.

त्याची धग भाजपच्या उमेदवारांना बसू लागली आहे. अनेक मतदारसंघात भाजपचे आमदार, खासदार यांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत आहे. भाजप विरोधी या वातावरणाचा फायदा गेले वर्षभर आंदोलनाच्या मागे उभ्या ठाकलेल्या राजदला मिळू लागला. त्यातून मार्ग काढण्यासाठी अमित शहा यांनी राजद नेते जयंत चौधरी यांनाच साद घालीत भाजपकडे बोलावले.

राजदची वाटचाल

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी जाट व मुस्लीम समाजाची ऐकी करीत पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाना या भागात सत्ता मिळविली. त्यानंतरच्या काळात शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत केले व त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांचेच वंशज आता पुन्हा जाट समाजाची ऐकी करू लागले आहेत. चरणसिंग यांचा मुलगा अजितसिंग यांनी प्रारंभी राजदची सुत्रे सांभाळली, तर आता नातू जयंत चौधरी राजदचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत ते दोघेही पराभूत झाले. राजदचा आता एकही खासदार अथवा आमदार नाही. भाजपने जाटांचा पाठिंबा मिळवत राजदला एक प्रकारे संपवले होते. जयंत चौधरी हाथरस येथे गेले, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला होता, तो व्हिडिओ समाजमाध्यमावर जोरात फिरला होता. मात्र, गेल्या वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनामागे राजदने त्यांचे पूर्ण समर्थन एकवटले. सध्या जाट समुदायापैकी मोठा वर्ग त्यांच्या मागे उभा राहिला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जयंत चौधरी यांच्याशी युती करीत 36 जागा दिल्या. यादव, जाट व मुस्लीम एक झाल्याने, पश्चिम उत्तरप्रदेशातील निवडणुकीचे गणितच बिघडले आहे. शेतकरी, कृषीमालाचा भाव, महागाई, बेरोजगारी या मुद्दांवर निवडणुकीचा प्रचार रंगू लागल्याने, सप-राजद आघाडीला मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, राजदला साद घालत अमित शहा यांनी मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

शहा यांची बैठक

भाजपने पश्चिम उत्तरप्रदेशाची जबाबदारी शहा यांच्यावर सोपविली. त्यांनी जयंत चौधरी यांच्यासोबत बैठकही घेतली. मात्र, जमले नाही. कैराना येथे प्रचार करताना, त्यांनी हिंदू कुटुंबाच्या पलायनाचा मुद्दा मांडला. पण, सध्यातरी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण होत नसल्याने, अन्य मुद्दे प्रभावी ठरू लागले. त्यानंतर शहा यांनी दुसरी राजकीय चाल रचली.

खासदार प्रवेश वर्मा यांच्या घरी दिल्लीला भाईचारा संमेलन ही बैठक घेतली. 50 खापचे अडीचशे जाट नेते उपस्थित होते. उसाचे पेमेंट, जाट आरक्षण याकडे लक्ष देण्याचे आश्वासन देतानाच शहा यांनी जयंत चौधरी यांच्याविषयी भाष्य केले. एकवेळ भाजपला न देता जयंत चौधरी यांना मत द्या, मात्र, आघाडीला मते देऊ नयेत, असा संदेश देण्यात आला. निवडणुकीनंतर, राजदने बरोबर येण्याबाबतही बोलले गेले. भाजप जाट विरोधी नसल्याचा स्पष्टीकरण करण्यात आले. त्याचा थेट परिणाम होणार आहे, तो समाजवादी पक्षाच्या उमेदवारांवर. विशेषतः मुस्लीम समाजाच्या उमेदवारांच्या निकालावर. त्यामुळे, पुन्हा ध्रुवीकरणाच्या दिशेने वाटचाल वेगळ्या मार्गाने सुरू झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यास, आघाडीच्या निकालावर विपरीत परिणाम होण्यावर वेळ लागणार नाही.

जयंत चौधरींचे उत्तर

शेतकरी आंदोलनात सातशे बळी गेले. त्यांच्या कुटुंबियांना मदत करा, असे ट्विट करीत जयंत चौधरी यांनी तातडीने शहा यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, जाट समाजाने यापूर्वी भाजपला मते दिली, मात्र भाजपने मतदारांना धोका दिला. शहा यांची नजर माझ्यावर नाही. येथील लोक आमच्यासोबत आहेत, त्याची त्यांना भिती वाटते. मी सप आघाडीसोबतच राहीन. बदलणार नाही. जुन्या दंगलीची आठवण येथील लोकांना नको आहे. पण, भाजपचे नेते तीच भाषा करीत आहेत.

जयंत-अखिलेश एकत्र

पश्चिम उत्तरप्रदेशातील 103 मतदारसंघात दहा व चौदा फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे कार्यकर्ते एकत्रित ठेवण्यासाठी जयंत चौधरी व अखिलेश यादव मुझफ्फरनगर येथे एकत्र येत आहेत. जाट व मुस्लीम एकत्र ठेवण्यासाठी ते दोघेही प्रयत्नशील राहतील. निवडणूक प्रचाराचे पुढील दोन आठवडे महत्त्वाचे आहेत. या दोन समाजाबरोबरच अन्य समाजाचे मतदार एकत्र ठेवल्यास, आघाडीच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढतील. तसेच येथील मतदानाच्या वातावरणाचे पडसाद निवडणुकीच्या पुढील टप्प्यांवरही पडतील. त्यामुळे, आघाडीचे नेतेही सजग झाले आहेत. मात्र, अमित शहा यांनी मास्टरस्ट्रोक मारत पुन्हा एकदा त्यांना पाहिजे त्या ट्रॅकवर निवडणुकीचा प्रचार नेण्यात यश मिळविले आहे, हे नक्की.

Back to top button