जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध | पुढारी

जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रक्तदान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध

जळगाव : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान करून जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचा निषेध करण्यात आला. जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाचे व शेतकऱ्यांचे रक्त शोषित आहे. त्यासाठी स्वाभिमानी संघटनेतर्फे रक्तदान आंदोलन करण्यात येऊन या रक्ताच्या बाटल्या जिल्हा प्रशासन व कृषी आयुक्त यांना भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विवेक सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. सोनवणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, 2020 ते 2021 या कालावधीत कृषि पीक विम्यामार्फत शेतकऱ्यांची लूट करण्यात आली. त्यास जिल्हा प्रशासन व कृषी विभागानेही समर्थन दिले.  2019 ते 2020 मध्ये शेतक-यांना पिक विमा मिळाला नाही. 20- 21 मध्ये चक्रीवादळामुळे शेतक-यांचे  शंभर टक्के नुकसान होऊनही कृषि पीक विमा कंपन्यांनी फक्त 30 ते 40 टक्केच मदत जाहीर केली.  मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ, यावल, रावेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र नुकसानीच्या फक्त दहा ते वीस टक्केच मदत केली जात आहे. 86 महसूल मंडळांपैकी फक्त 22 महसूल मंडळांना नुकसानभरपाई देण्यात आली. यातून 64 मंडळांना वगळण्यात आल्याचा आरोपही डॉ. सोनवणे यांनी यावेळी केला. पिक विमा कंपनी, राजकीय नेत्यांनी व जिल्हा प्रशासनाने लागेबांधे करून शेतकऱ्यांना लुटल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर 2010 पासून दिव्यांगांसाठी असलेल्या कल्याणकारी योजन राबवल्या गेलेल्या नाही. यासाठी अनेक वेळा आंदोलने व निवेदने देण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने इतिवृत्त काढूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्याचेही सोनवणे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी पाठीशी घालत असून नागरिकांना धान्य मिळत नाही. एकप्रकारे जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचे व दिव्यांगांचे रक्त शोषित असल्याचा घणाघात डॉ. सोनवणे यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button