धारागिर येथे पोलिसांच्या धाडीत लाखोंची बनावट दारु जप्त ; पाळधीहून एकाला अटक केल्याने खळबळ | पुढारी

धारागिर येथे पोलिसांच्या धाडीत लाखोंची बनावट दारु जप्त ; पाळधीहून एकाला अटक केल्याने खळबळ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या माहितीवरून पाळधी येथून एकाला अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यातील धारागिर येथे टाकलेल्या धाडीत सुमारे १ लाख ६० हजाराच्या बनावट दारूसह एक वाहन मिळून असा एकूण मुद्देमाल जप्त केलाय. तर सचिन पाटील  (रा. पाळधी. ता. धरणगाव) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या भूपेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून सचिन पाटील याला आज पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच भूपेंद्र मराठेने दिलेल्या माहितीवरून एरोडल तालुक्यातील धारागिर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातील कडबा गंजीमध्ये दडवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट टॅंगो पंच देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच या दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ लाखांची मिनिट्रक (एम एच – १८ – ए ए ८६८४ ) यावेळी जप्त करण्यात आली आहे.

तर याअगोदर या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा आणि काल पोलीस कोठडीतील आरोपीने दिलेल्या माहितीनंतर ७ लाख ७३ हजार ४०० असा १८ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आलेला आहे. तर धुळ्याचा आरोपी फरार आहे. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सी.एच पाटील, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, आनंद पाटील, जवान एन.व्ही. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहूल सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button