या 22 गावांवर आली होती पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ; पण आता ‘ही’ योजना कार्यान्वित झाल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे | पुढारी

या 22 गावांवर आली होती पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ; पण आता 'ही' योजना कार्यान्वित झाल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : मनेगावसह 22 गावे पाणीपुरवठा योजना तब्बल 60 दिवसांनंतर कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे हजारांवर ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. वीज देयकाच्या थकबाकीमुळे योजना वारंवार खंडित होत होती. महावितरणच्या कारवाईमुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. पाणी योजना बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ 22 गावांवर आली होती.

वीज देयक वारंवार थकीत होत होते. त्यामुळे वर्षभरात पाच वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. देयक भरण्यासाठी काही ग्रामपंचायती तयार नव्हत्या, तर पाण्याची आवश्यकता असलेल्या गरजू ग्रामपंचायतींकडे पुरेसा ग्रामनिधी नसल्याने अडचण होती. योजना सुरू करण्याबाबत केवळ बैठका होत होत्या. प्रत्यक्षात कृती होत नव्हती.

मनेगावसह 22 गावे, बारागाव पिंप्रीसह सात गावे योजना कार्यान्वित होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी योजना समितीसह ग्रामसेवकांची दोन वेळा बैठक घेतली. त्यानंतर गटविकास अधिकारी मुरकुटे व तहसीलदार कोताडे यांनी स्वतंत्र बैठक घेतली. तथापि वीज देयक भरण्यासाठी ग्रामपंचायती गांभीर्याने घेत नसल्यामुळे अखेर तहसीलदार कोताडे यांनी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा ग्रामनिधीची खातरजमा करून गावनिहाय वीज देयक भरण्याचे आदेश दिल्याने थकीत वीज देयकासाठी निधी जमा झाला.

अधिकार्‍यांचा ग्रामस्थांनी केला गौरव
योजना सुरू करण्यासाठी तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे आदींसह योजनेतील समाविष्ट गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व सदस्यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने थकीत वीज देयक भरण्यात आले. त्यामुळे योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आल्याने धोंडवीरनगरचे सरपंच, सदस्यांनी तहसीलदार कोताडे, गटविकास अधिकारी मुरकुटे यांचा गौरव केला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

Back to top button