नाशिक : लासलगाव बाजार समितीला अमावस्‍या पावली; उलाढालीत २५० कोटींची वाढ | पुढारी

नाशिक : लासलगाव बाजार समितीला अमावस्‍या पावली; उलाढालीत २५० कोटींची वाढ

लासलगाव; पुढारी वृत्‍तसेवा 

स्पर्धेत टिकायचे असेल तर वेळेनुसार, परिस्थितीनुसार परिवर्तन करून घेत बदल करून घेणे आवश्यक आहे. गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला बंद असलेले कांदा लिलावाच्या रूढी, परंपरा याला थांबवत लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यापारी वर्गाशी समन्वय साधत कांदा लिलाव सुरू केला. बाजार समितीत शनिवार आणि अमावस्या मिळून कामकाज वाढवत २५० कोटींची उलाढाल वाढवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील अनेक बाजार समितीने लासलगाव बाजार समितीचा आदर्श घेत अमावस्येच्या दिवशी बाजार समितीत लिलाव सुरू केले आहेत.

कांद्याची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. देशभरातील कांदा दर हे लासलगाव बाजार समिती वरून ठरले जातात. कांद्या संदर्भात काहीही निर्णय झाला तर संपूर्ण देशाचे लक्ष लासलगावकडे लागलेले असते. असाच एक निर्णय १० जून २०२१ पासून अमावस्या पासून लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी ऐतिहासिक निर्णय घेत लिलाव सुरू केले, या निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत १२ लाख क्विंटल कांदा आवक वाढली आहे.

लासलगांव बाजार समितीची स्थापना 01 एप्रिल, 1947 रोजी झाली. स्थापनेपासुन 75 वर्षाच्या कालखंडात लासलगांव बाजार समितीत अमावस्येला कांदा, भुसार व तेलबिया ह्या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे. परंतू शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व परीसरातील शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगांव बाजार समितीने अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहेत.

शेतकरी वर्गाच्या हितासाठी अमावस्येला आणि शनिवारी बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहे. यातून बाजार समितीच्या  उलाढाल  वाढलेली आहे. बाजार समितीच्या मी व माझ्या संचालक मंडळाने व्यापारी वर्गाची चर्चा करून अनावश्यक पारंपारिक अमावस्या शनिवार व सार्वजनिक सुट्टया या दिवशी कांदा लिलावाचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी चर्चा करून त्यास व्यापारी वर्गाने सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे ७५ वर्षापासून या दिवशी बंद असलेले कामकाज सुरू झाल्याने बाजार समितीचे आवकेत वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा होत आहे.

सुवर्णा जगताप , सभापती , लासलगाव बाजार समिती

Back to top button