पारोळा : आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावं लागलं गाव - पुढारी

पारोळा : आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावं लागलं गाव

पोराळा, पुढारी ऑनलाईन : आंतरजातीय विवाहासंदर्भात आजही समाजाची मानसिकता फारशी बदललेली नाही. आजही अशा दाम्पत्यांना समाजाच्या, जातीच्या आणि नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका गावात घडलेली आहे. या घटनेत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यावर गाव सोडण्याची वेळ आलेली आहे.

पारोळा तालुक्यातील या तरुण-तरुणीने एकमेकांच्या सहमतीने १५ ऑगस्ट रोजी आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या घरातील लोकांचा विरोध होता. मात्र, लग्नानंतर या दोघे जण पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांच्याही पालकांना बोलावून परिस्थिती समजून सांगून मुलगी सज्ञान असल्याने आपल्या पतीसोबत राहण्याचे मान्य केल्यामुळे कायदेशीरित्या तशी पोलिसांत नोंद झाली.

मात्र, मुलीच्या घरातील सदस्यांकडून मुलाच्या नातेवाईकांना आणि त्यांला त्रास दिला जात आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मुलाने केला आहे. ही कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.

या दाम्पत्याने सांगितले की, ” आई-वडिलांना घरात घुसून आणि सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली जात आहे. त्याचबरोबर शिवीगाळदेखील केली जात आहे. आम्हालाही मारहाण केली जात आहे. गावात राहायचे नाही, गाव सोडा, नाहीतर जीवे मारुन टाकू, अशी धमकीदेखील दिली जात आहे. कायदेशीररित्या आम्ही विवाह केला असून आम्हाला न्याय मिळावा”, अशी मागणी या दाम्पत्याने केली आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे म्हणाले की, “या प्रकरणात परस्परविरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.  चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मुलीच्या वडिलांना समज देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दाम्पत्य सज्ञान असून पोलीस त्यांची काळजी घेत आहेत. आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल.”

Back to top button