शेतकऱ्याने केला बोकडाचा दशक्रिया विधी : समाधीदेखील उभारली! | पुढारी

शेतकऱ्याने केला बोकडाचा दशक्रिया विधी : समाधीदेखील उभारली!

गोंदेगाव : चंद्रकांत जगदाळे

माणूस आणि प्राणी यांच्या प्रेमाच्या कथा आपण नेहमी ऐकतो. ग्रामीण भागातील पाळीव प्राणी नाही असं एक घर सापडणार नाही. त्याचाच भाग म्हणून पाळीव प्राण्यांप्रती अनेकांना जिव्हाळा असतो. अनेक कुटुंबाचा सदस्य म्हणून बैल,गाय, कुत्रा, मांजर आदी प्राण्यांवर जीवापाड जपणूक केल्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर विधिवत अंत्यसंस्कार केल्याच्या घटना नव्या नाहीत; परंतु, बोकडाचा दशक्रिया विधी आणि समाधी उभारली असे कोणी सांगितले तर विश्वास बसेल का ? निफाड पूर्व भागात मात्र असे घडले आहे. बोकडाचे विधिवत अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी,गाव जेवण तर पार पडलेच शिवाय समाधी देखील उभारली आहे. बोराडे कुटुंबियांची कृतज्ञता परिसरात चर्चेचा विषय ठला आहे.

मानोरी खुर्द येथील उत्तम बोराडे आपल्या कुटुंबासह शेती करतात. शेती कसण्यासाठी बैल, दुधासाठी गाय आणि शेळ्या, संरक्षणासाठी कुत्रा आणि मांजर असे प्राणी त्यांच्या घरात आहेत.

सतरा वर्षांपूर्वी त्यांच्याकडे असलेली शेळी व्यायली. तिने तीन बकऱ्यांना जन्म दिला होता. त्यापैकी एक बोकड होता. त्याचे नाव या कुटुंबाने ‘दावल’ ठेवलं. तेव्हापासून तो कुटुंबाचा सदस्य झाला. कुत्रा, मांजर, गाय, बैल यांचा सांभाळ करता करता दावलचा देखील सांभाळ केला. दावलला आवाज दिला की छोटासा दावल उड्या मारत धावत यायचा. दावलचा बोराडे कुटुंबीयांशी इतका लळा लागला की त्यांनी मरेपर्यंत सांभाळण्याचा निर्णय घेतला.

अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. आजारपणात दवाखाने केले. सतरा वर्षे त्याने बोराडे यांच्या सुख दुःखात साथ दिली. दावलच्या जन्मापासून त्यांच्या कुटुंबास स्थैर्य प्राप्त झाल्याची त्यांची भावना आहे. २८ डिसेंबरला दावल आजारी पडला. बोराडे कुटुंबीयांनी पशु वैद्यकीय तज्ज्ञांना बोलावले असता दावलचे वयोमान झाल्याने औषधांचा उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नव्या वर्षात एक जानेवारी ला दावलचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर माणसाप्रमाणे दावलचा दफनविधी घरासमोर पार पाडला गेला.त्याच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी अगदी घरासमोर समाधी देखील बांधली आहे. सोमवारी दि.१९ तारखेला दशक्रिया विधी पार पडला. दहा दिवस दुखवटा देखील पाळला. दशक्रिया कार्यक्रमात प्रवचन झाले. शिरा आणि मसाले भात मेनू ठेवत गावजेवण देखील देण्यात आले. चारशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था बोराडे यांनी केली होती. जागोजागी बॅनर देखील उभारले असल्याने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून बोराडे कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदविला. बोराडे कुटुंबियांची कृतज्ञता परिसरात चर्चेचा विषय ठला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button