Pune motorcycle Fire : १५ वाहने आगीत जळून खाक, शिवणे परिसरातील घटना | पुढारी

Pune motorcycle Fire : १५ वाहने आगीत जळून खाक, शिवणे परिसरातील घटना

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली. आग लावून वाहने कोणीतरी जाणीवपूर्वक जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. (Pune motorcycle Fire)

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.

पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.

Pune motorcycle Fire : जाणीवपुर्वक आग लावल्याचा संशय

अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होऊन तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते.

मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरचे बॉक्सना आगीची झळ पोहचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे.

या इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, आवाज आल्याने आम्ही खाली आलो, तेव्हा सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक झाल्या होत्या.

Back to top button