

Mumbai Terror Suspect Yash Singh Arrest
मुंबई : मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविघातक घटकांना पुरवल्याच्या संशयावरून २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. यश सिंह असे या तरुणाचे नाव असून, केरळ पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबई दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यश सिंह हा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संशयित देशविघातक घटकांच्या संपर्कात होता. सोशल मीडिया हँडलर्सकडून त्याला मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे, विदेशी नागरिकांची माहिती, वाहनांचे तपशील आणि अचूक लोकेशन पाठवण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये कुलाबा परिसरातील ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेल्या छाबड हाऊसचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
या कामाच्या बदल्यात त्याला आर्थिक मोबदला मिळत असल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करताना त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क असल्याची माहिती समोर आली.
नवी मुंबई एटीएसने या प्रकरणी केरळ पोलिसांशी समन्वय साधून तपास सुरू केला. त्यानंतर केरळ पोलिसांचे पथक नवी मुंबईत दाखल झाले. संबंधित तरुणाची चौकशी आणि तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा या प्रकरणातील कथित सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणामुळे मुंबईतील संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तरुणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपर्क, सोशल मीडिया हँडलर्सची ओळख आणि माहिती पुरविण्यामागील उद्देश यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.