Youth Mental Health: ‘मी ठीक आहे’ म्हणतात, पण मनात काय? ४९.५% तरुण भावनिक त्रास लपवतात; सर्वेक्षणातून धक्कादायक चित्र

१८ ते २५ वयोगटातील ४९.५ टक्के तरुण भावनिक अडचणी स्वतःपुरत्याच ठेवतात, तर केवळ ९.२ टक्के जणांनी मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घेतल्याचे सर्वेक्षणात आढळले. ४०.९ टक्के तरुण मानसिकदृष्ट्या ठीक नसतानाही ‘मी ठीक आहे’ असे सांगतात.
Youth Mental Health
Youth Mental HealthPudhari
Published on
Updated on

मुंबई: ‘मी ठीक आहे...’ असे म्हणत प्रत्यक्षातील भावनिक तणाव दडविणाऱ्या तरुणांची संख्या मोठी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. १८ ते २५ वयोगटातील ४९.५ टक्के तरुण आपल्या भावनिक अडचणी स्वतःपुरत्याच ठेवतात आणि त्यावर स्वतःच मात करण्याचा प्रयत्न करतात. तर केवळ ९.२ टक्के तरुणांनी मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे भावनिक त्रास सहन करताना तरुण मोठ्या प्रमाणात एकटे पडत असल्याचे चित्र आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर एमपॉवरने देशातील दहा शहरांमधील १८ ते २५ वयोगटातील तरुणांचे सर्वेक्षण केले. मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळूर, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूरमधील तरुणांचा यात समावेश होता.

सर्वेक्षणातील ४०.९ टक्के तरुणांनी आपण मानसिकदृष्ट्या ठीक नसतानाही इतरांना ‘मी ठीक आहे’ असे सांगत असल्याचे नमूद केले. भावनिक त्रासाबाबत बोलणे टाळणे, स्वतःला सतत व्यस्त ठेवणे किंवा समस्येकडे दुर्लक्ष करणे, अशा पद्धतीने अनेक तरुण परिस्थितीशी सामना करत असल्याचे दिसून आले आहे.

Youth Mental Health
IIT Mumbai News: IIT मुंबईचा मोठा निर्णय! परीक्षा गैरप्रकाराच्या शिक्षेचा फेरविचार; विद्यार्थ्यांसाठी ‘सपोर्ट पोर्टल’

‘मजबूत राहा’चा सल्ला

भावना व्यक्त केल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रियांमध्येही मोठी तफावत आढळली. ४०.४ टक्के तरुणांना ‘मजबूत राहा’ असा सल्ला मिळतो. काहींना ‘अतिविचार करू नका’, ‘अभ्यास आणि कामावर लक्ष केंद्रित करा’, असे सांगितले जाते. मात्र केवळ १३.६ टक्के तरुणांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपले म्हणणे ऐकून घेणारा आणि पाठिंबा देणारा अनुभव व्यक्त केला.

महिलांना अतिविचार, शरीरयष्टीची चिंता

महिलांमध्ये अतिविचार करण्याचे प्रमाण ६० टक्के, स्वतःविषयी शंका ५६ टक्के, तर शरीरयष्टीविषयी चिंता ६९ टक्के असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. पुरुषांमध्ये कामाशी संबंधित ताण ५७ टक्के आणि आर्थिक असुरक्षितता ५४ टक्के ही प्रमुख कारणे आढळली.

Youth Mental Health
Engineering Admission: अभियांत्रिकी प्रवेशाला मुदतवाढ द्या; वंचित विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी

चिडचिड, एकाग्रतेवर परिणाम

भावनिक तणावाचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होत असल्याचे दिसून आले. ४७ टक्के तरुणांनी सहज राग येणे किंवा चिडचिड होणे, तर ३६.७ टक्के तरुणांनी लक्ष केंद्रित करण्यात किंवा आवडत्या गोष्टींचा आनंद घेण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. ३१.३ टक्के तरुणांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news