

मुंबई: आयटीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा गैरप्रकारासाठीच्या शिक्षेच्या तरतुदींचा फेरविचार करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून विद्यार्थ्यांच्या तक्रारी स्वीकारणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती देण्यासाठी ‘सपोर्ट पोर्टल’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदार यांनी सोमवारी केली.
दुसऱ्या वर्षातील बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत यापूर्वी जारी केलेल्या निवेदनाबद्दल संस्थेने माफी मागितली असून, प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना डीन पदाच्या जबाबदारीतून तूर्तास मुक्त करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी संस्थेच्या कॉमन हॉलमध्ये सुमारे चार तास खुले चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी संचालक प्रा. केदार, वरिष्ठ प्राध्यापक, अधिष्ठाते तसेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा गैरप्रकारावरील शिक्षेच्या तरतुदी, तक्रार निवारण यंत्रणा, वसतिगृह सुविधा, मानसिक आरोग्यविषयक मदत, प्रशासकीय उत्तरदायित्व यांसह विविध मुद्दे मांडले.
आयआयटी मुंबईने जुलै २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार, परीक्षेदरम्यान चिठ्ठ्या, मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्टवॉच किंवा स्मार्ट ग्लासेससारखी अनधिकृत साधने जवळ बाळगणे अथवा वापरणे, इतर विद्यार्थ्यांना अनधिकृत साहित्य पुरवणे, शरीरावर लिहिलेली माहिती आढळणे किंवा परीक्षा सुरू असताना बायो-ब्रेकदरम्यान अनधिकृत साहित्य आणणे अथवा वापरणे यांसारख्या प्रकारांसाठी ‘एफआर-२’ ग्रेड आणि एका सत्रासाठी शैक्षणिक निलंबनाची तरतूद आहे.
परीक्षेदरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याशी तोंडी संवाद साधणे किंवा उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनादरम्यान कॉपी आढळणे यासाठी ‘एफआर’ ग्रेडची तरतूद आहे.
गैरप्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास किमान एका सत्राच्या शैक्षणिक निलंबनाची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी या शिक्षेच्या तरतुदींचा घटनेच्या पार्श्वभूमीवर फेरविचार करण्याची मागणी केली. त्यावर प्रा. केदार यांनी आगामी सिनेट बैठकीत परीक्षा गैरप्रकाराच्या शिक्षेच्या तरतुदींचा आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले.