

मुंबई : शिकवणीदरम्यान एका चौदा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ३६ वर्षीय योगा शिक्षकाला काळाचौकी पोलिसांनी बुधवार, दि. ३० डिसेंबरला अटक केली.
आरोपी योगा शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यात त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलनी आहे. ४५ वर्षांचे तक्रारदार काळाचौकी परिसरात राहत असून व्यावसायाने कारपेंटर आहेत. त्यांची पिडीत चौदा वर्षांची मुलगी असून ती जवळच असलेल्या आरोपीकडे योग प्रशिक्षणासाठी जात होती.
२६ डिसेंबरला ती नेहमीप्रमाणे योग शिकवणीसाठी आरोपीकडे गेली होती. दुपारी तीन वाजता आरोपीने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकी देऊन त्याने तिची सुटका केली.
घरी आल्यानंतर तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. या घटनेनंतर त्यांनी तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला बुधवारी ३० डिसेंबरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसऱ्या दिवशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर धक्कादायक प्रकार समजल्यानंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.