

मुंबई : मुंबईतील घरांची विक्री किंमत प्रचंड वाढलेली असताना आता घर भाड्याने घेणेही महागले आहे. वरळीतील एका इमारतीतील फ्लॅट ५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला. या फ्लॅटचे मासिक भाडे २७.५ लाख असून, त्यात दरवर्षी ५ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी एकूण १८ कोटींचा भाडेकरार करण्यात आला आहे.
डी मार्टचे संस्थापक राधाकृष्णन दमानी यांच्या डिराईव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संजय घोडावत ग्रुपच्या वन एसजीजी व्हेंचर्स एलएलपीला वरळीतील ओबेरॉय ३६० वेस्ट या इमारतीतील फ्लॅट भाड्याने दिला आहे. ६ हजार ८३१ चौरस फुटांची ही सदनिका आहे. या गृहनिर्माण प्रकल्पात दोन टॉवर्स आहेत, ज्यात ४ आणि ५ बीएचके दमजली घरे आहेत.
फ्लॅट भाड्याने देण्यासाठी १.६५ कोटी सुरक्षा ठेव घेण्यात आली आहे. यासोबत ४ गाड्यांच्या पार्किंगची सुविधा आहे. मासिक २७.५ लाख रुपये भाडे भरले जाणार आहे. त्यात दरवर्षी ५ टक्के वाढ झाल्यानंतर ५ वर्षांचे एकूण भाडे १८ कोटी रुपये होईल. २७ मे २०२६ रोजी झालेल्या या भाडेकरारासाठी ४.७३ लाख रुपये मद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
मुंबईतील जमिनीची आणि निवासी सदनिकांची वाढत जाणारी किंमत पाहता गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. यामुळे घरांच्या किमती तर प्रचंड वाढत आहेत; शिवाय भाड्याच्या दरावरही परिणाम होत आहे. विविध पायाभूत सुविधांमुळे निर्माण झालेली व्यवसाय सुलभताही यासाठी कारणीभूत आहे.