Golfa Devi Navratri Festival : भक्तांच्या हाकेला धावून येणारी गोलफा देवी

नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची होतेय गर्दी; कौल घेऊन शुभकार्यांना सुरुवात करण्याची परंपरा
Golfa Devi Temple Worli
Golfa Devi Temple Worlipudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : आदिती कदम

वरळी गावाची ग्रामदेवता असलेल्या गोलफा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि कौलाद्वारे भक्तांशी संवाद साधणारी देवी, अशी गोलफा देवीची ख्याती आहे. त्यामुळे वरळीतील रहिवाशांसह मुंबईच्या विविध भागांतून तसेच गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि राजस्थान येथूनही भाविक नवस फेडण्यासाठी देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात दररोज रात्री देवीचा गोंधळ घातला जातो.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना संरक्षक सिंह असलेले दोन मोठे स्तंभ आहेत, मंदिराच्या बाहेर एक मोठी व्हरांडा आहे जिथे मुले संध्याकाळी खेळायला येतात, आत एका उंच चौथऱ्यावर गोल्फा देवी तिच्या दोन्ही बाजूंना तिच्या दोन बहिणींसह विराजमान आहे,दगडी मूर्तींना शेंदूर लावलेला असून त्या दागिन्यांनी आणि भरतकाम केलेल्या वस्त्रांनी सजवलेल्या आहेत.

Golfa Devi Temple Worli
JJ Hospital Mumbai : 'जे. जे' मध्ये हृदयावरील महागडे उपचार मोफत

मुख्य देवीच्या शेजारी दोन लहान चांदीचे गोळे ठेवलेले आहेत, जे कोणी काही मागण्यासाठी आल्यावर फक्त पुजारीच मुख्य मूर्तीच्या खांद्यावर ठेवतात. वरळीची ‘बोलणारी देवी’ म्हणून गोलफा देवी प्रसिद्ध आहे. कौल विधीद्वारे देवी भक्तांच्या प्रश्नांना होकार किंवा नकार देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विधीत पुजारी देवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चांदीच्या सुपाऱ्या ठेवतात. उजव्या बाजूची सुपारी म्हणजे होकार, तर डाव्या बाजूची सुपारी म्हणजे नकार, अशी मान्यता आहे. कोणती सुपारी प्रथम पडते, यावरून कौलाचा अर्थ लावला जातो.

कोळी बांधवांमध्ये या परंपरेला विशेष महत्त्व आहे. वैयक्तिक तसेच सामाजिक कामांना सुरुवात करण्यापूर्वी देवीचा कौल घेण्याची प्रथा आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वीही मच्छीमार देवीचे दर्शन घेऊन सुखरूप प्रवास आणि चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी प्रार्थना करतात.

Golfa Devi Temple Worli
Rahuri District Bank Election: आता थांबणार नाही! राहुरीतून सत्यजित कदम ठाम; तनपुरेंची कोंडी

भक्ती, श्रद्धा, धार्मिक विधींचा संगम

शाकंभरी पौर्णिमेला वार्षिक यात्रा गोलफा देवीचा वार्षिक उत्सव पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला साजरा केला जातो. यात्रेच्या तयारीसाठी मंदिर आणि परिसराची महिनाभर स्वच्छता केली जाते. या काळात मूर्तींना नव्याने सिंदूर लेपन करण्याची प्रक्रिया सुमारे दहा दिवस चालते. या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवून प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. यात्रेच्या आदल्या दिवशी सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव आणि वार्षिक यात्रेच्या निमित्ताने गोलफा देवीच्या मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक धार्मिक विधींचा संगम अनुभवायला मिळतो.

बाराव्या शतकातील मंदिराची परंपरा

गोलफा देवी हे वरळी गावाचे प्राचीन दैवत मानले जाते. राजा भीमदेव, बिंबदेव किंवा बिंबशाह या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या राजाने बाराव्या शतकात गावातील टेकडीवर मंदिराची स्थापना केल्याची मान्यता आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सकबा देवी, गोलफा देवी आणि हरबा देवी यांच्या दगडी मूर्ती आहेत. या मूर्तींना सिंदूर लेपन केले जाते. नवरात्रोत्सवात सकाळी आणि सायंकाळी आरती होते. त्यानंतर भाविकांकडून देवीचा जागर करण्यासाठी गोंधळ घातला जातो. रात्री देवीचा साजशृंगार केला जातो. अष्टमीला रात्री होमहवन आणि पूर्णाहुती होते. याशिवाय देवीचा भंडाराही भरविला जातो, अशी माहिती विश्वस्त प्रकाश कोळी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news